माजी पीएमच्या अंत्यविधीला पाण्यासारखा पैसा खर्च !

Story: विश्वरंग | सुदेश दळवी |
01st October 2022, 12:26 Hrs
माजी पीएमच्या अंत्यविधीला पाण्यासारखा पैसा खर्च !

प्रत्येक धर्मानुसार मानवाच्या पार्थिवावर अंत्यविधी केला जातो. अर्थात, प्रत्येकजण शक्य तेवढा खर्च रीतीनुसार करतोच. व्यक्ती मोठी असेल आणि समाज किंवा जगाला वाट दाखवणारी असेल तर त्या व्यक्तीच्या अंत्यविधींसाठी मोठा खर्च केला जातो. जपानच्या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पार्थिवावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधी सोहळ्यासाठी कित्येक कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.                  

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची ८ जुलै २०२२ ला निवडणूक प्रचारादरम्यान हत्या झाली होती. आता जवळपास तीन महिन्यांनंतर (२७ सप्टेंबर) त्यांच्या पार्थिवावर  राजकीय इतमामात अंत्यसंस्कार  करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी एकंदर ९१० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला. या कार्यक्रमात विविध देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान सहभागी झाले होते. या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चासाठीच जपान सरकारने करदात्यांच्या पैशांचा अपव्यय केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच टोकियोतील कोर्टातदेखील या कार्यक्रमावर बंदी आणण्याबद्दल याचिका दाखल झाली होती. सगळीकडेच या अवाजवी खर्चाबद्दल चर्चा सुरू होती. तसेच लोकंही राजकीय दुखवटा पाळण्यास तयार नव्हते.       

परंपरेनुसार, जपानमधील रॉयल फॅमिली आणि पंतप्रधानांच्या अंतिम संस्कारांवर होणारा खर्च हा सरकारी खर्चातून केला जात नाही. उलट अशावेळेस त्या व्यक्तीच्या वैयक्तिक खर्चातून हा कार्यक्रम केला जातो किंवा त्या व्यक्तीचे निकटवर्तीय हा खर्च करतात. यासाठीच आबेंच्या राजकीय अंत्यविधीला विरोध करण्यात आला होता. या अत्यंविधीसाठी जवळपास ६४०० लोकांच्या सुरक्षेची तयारी केली होती. यामुळेच एकूण खर्च हा कोटींच्या घरात गेला आहे.                  

दरम्यान, शिंजो आबेंच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे १९० पेक्षा अधिक देशांतून प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. या सर्वांच्या स्वागतासाठी ६०० दशलक्ष डॉलर खर्च होईल, असे म्हटले होते. १०० दशलक्ष डॉलर्स हे राजकीय मिशन यात्रेसाठी आणि इतर गोष्टींसाठी खर्च होणार होते. उरलेले १.६६ कोटी दशलक्ष डॉलर्स हे पोलिसांच्या सुरक्षेसाठी आणि ओव्हरटाईमचा खर्च यासाठी खर्च होतील. तसेच सेल्फ डिफेन्स फोर्स गार्ड ऑफ ऑनरसाठी मोठी रक्कम खर्च करण्यात येणार होती, असे जपान सरकारने सांगितले होते. पण, वास्तवात किती खर्च झाला हे समजू शकले नाही.                  

देशाच्या नेत्याच्या अंत्यसंस्कारांसाठी किती पैसे खर्च करायचे हा ज्या-त्या देशाचा प्रश्न आहे. तरीही जनतेचा पैसा कुठे वापरावा यालाही तारतम्य असायला हवे. दरम्यान, वाढत्या बजेटवर बोलताना विरोधी पक्षाचे अर्थात डेमोक्रेटिक पार्टीचे संसदीय कामकाजाच्या समितीचे अध्यक्ष जून अजुमी म्हणाले, २५० दशलक्ष डॉलर्स इतका खर्च होईल, असे सांगितले होते. पण, आता हा खर्च ६.६ पटीने वाढला आहे. हा सगळा प्रकार म्हणजे पैशांची नासाडीच आहे.