मुले पळवण्याच्या संशयातून मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

वास्को पोलिसांकडून इतरांचा शोध सुरू

|
30th September 2022, 12:20 Hrs
मुले पळवण्याच्या संशयातून मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वास्को : दोन दिवसांपूर्वी एका मुलाला पळवून नेत असल्याच्या संशयावरून एका मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या धीन जोन्स (५२) यांना मारहाण केल्यावरून वास्को पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. इतर अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक केलेल्यांमध्ये सौदागर निस्सार रेन (२५, रा. खारीवाडा), बसवराज राठोड (३२) व अन्वर कालीगर (२६, रा. कासावली) यांचा समावेश आहे. सौदागर हा मासळी ट्रकमध्ये चढवण्याचे, बसवराज फिशिंग ट्रॉलरवर, तर अन्वर खासगी बसवर वाहकाचे काम करतो.

मंगळवारी (दि. २७) सायं. ६.१५च्या सुमारास जुन्या बसस्थानक रस्त्यावरून जात असलेल्या एका १२ वर्षीय मुलाला जोन्स यांनी हात लावला. त्यामुळे तो घाबरून पळाला. तेथे उपस्थित लोकांना जोन्स हे त्या मुलाला पळवून नेत असल्याचा संशय आला. जमावाने कुन्हा चौकातील पवन मोबाईल दुकानाजवळ जोन्स यांना पकडले. जमावातील काही जणांनी जोन्स यांना लाथाबुक्क्या, काठीने मारहाण केली. यामुळे जोन्स तेथेचे निपचित पडले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी जोन्स यांना जमावाच्या तावडीतून सोडवले. तथापि काही लोकांनी जोन्स यांना पोलीस वाहनात उचलून ठेवत असतानाही मारहाण केली. जोन्स हे पुद्दुचेरीचे रहिवाशी असून त्यांना इतर गोष्टी आठवत नाहीत. ते असंबद्ध बोलतात. त्यामुळे त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील मानसोपचार व मानवी वर्तवणूक संस्थेत दाखल केले.      

जोन्स यांना मारहाण केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी अज्ञातांविरोधात भा.दं.सं. १४३, १४७, ३२४ आर/डब्ल्यू १४९ तसेच अपंग हक्क कायद्याच्या ९२(ब) कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.