आणि मन प्रसन्न...!!!

Story: ललित | तन्मयी भिडे |
16th September 2022, 10:51 pm
आणि मन प्रसन्न...!!!

सकाळी सकाळीच दाटून आलेलं आभाळ, दमट हवा, सगळ्या वातावरणातच साचलेलं एक आळसावलेपण, कंटाळा... आणि मग अचानक सुटलेला गार वारा, टप टप पडणारे थेंब, पानांची सळसळ, मृदगंधाच्या अत्तराचा दरवळ, मनाची नाहीशी झालेली मरगळ, आणि मन प्रसन्न...

रात्रभर झालेलं जागरण, डोळ्यात जमलेलं त्रासलेपण, जराशा मोकळ्या हवेवर फेरफटका मारूया, म्हणून अंगणात आल्यावर, समोरच सांडलेला पांढऱ्या केशरी चिमुकल्या प्राजक्ताच्या फुलांचा सडा, आणि मन प्रसन्न....

अवेळी लागलेला डोळा, जरा जास्तीच लांबलेली वामकुक्षी, जड झालेलं डोकं, आणि न सांगताच मन वाचून काही न बोलता आईने हातात ठेवलेला कडक, आलं - गवती चहा युक्त वाफाळत्या चहाचा कप.. चहाचा तरतरी आणणारा पहिलाच घोट, आणि मन प्रसन्न... 

अशीच एक संध्याकाळ, उगीचच कंटाळलेलं मन, काहीच करू नये, नुसतं बसून रहावं असे उदासवाणे विचार, आणि बाबांनी radio लावलेल्या, दीदींच्या गंगोदकासारख्या पवित्र आवाजात कानांवर आलेला अभंग... "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" ...आणि क्षणात मन प्रसन्न...

रात्रीची वेळ, रात्रीच्या शांततेत मनात दाटून आलेलं कसलं तरी काहूर, अस्वस्थ मन, तेवढ्यात कुठूनसा आलेला रातराणीचा मंद गंध, आणि मन प्रसन्न....

बाहेर तळपता सूर्य, तप्त उन्हाच्या असह्य झळा... घरात पाऊल टाकताच कुंडीतल्या मोगऱ्याचा दरवळणारा परिमळ, आईने हातावर ठेवलेला गुळाचा खडा, आणि माठातलं थंडगार वाळा युक्त पाणी..गळ्यातून झिरपून पोटापर्यंत गेलेला तो थंडावा, आणि मन प्रसन्न...

Office च्या कामाचा ताण, झालेली चिडचिड.. त्याचवेळी WhatsApp वर कोणीतरी पाठवलेला एक छान video.लोभसपणे स्वतःशीच हसणारं, खिदळणारं, पाच-सहा महिन्यांचं छोटसं बाळ, ते गोंडस हसू आणि मन प्रसन्न....

कामाने व्यस्त दिवस, बारा तास screen समोर काम करून शिणलेले डोळे, जड झालेलं डोकं.. आईने तेलाने डोक्याला केलेला massage, मायेने केसांत फिरणारी बोटे, उबदार स्पर्श, काही क्षणांत नाहीसा झालेला शीण, आणि मन प्रसन्न.....