वैद्यकीय कारणास्तव वरवरा रावना जामीन

भीमा कोरेगाव‌ हिंसाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

|
10th August 2022, 08:07 Hrs
वैद्यकीय कारणास्तव वरवरा रावना जामीन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी वरवरा राव (८४) यांना जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांना न्यायालयाकडून जामीन देण्यात आला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कथित आरोपांनंतर वरवरा राव यांना अटक करण्यात आली होती. तीन महिन्यांनंतर आत्मसमर्पण करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली अटही सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे.
वैद्यकीय कारणास्तव कायमस्वरूपी जामीन मिळवण्यासाठी याआधी वरवरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळल्यानंतर राव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. वरवरा राव यांचे वय, ढासळलेले आरोग्य आणि तुरुंगात आत्तापर्यंत घालवलेला अडीच वर्षांचा कालावधी लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती यू. यू. ललित, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने राव यांना जामीन मंजूर केला आहे.
वरवरा राव आरोपी असलेल्या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू झाली नाही. न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले असले तरी अजुन आरोप निश्चित झाले नाहीत, असे निरिक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.