मूळ तक्रारदाराला प्रतिवादी करण्याचे खंडपीठाचे निर्देश

जीत आरोलकर जमीन व्यवहार प्रकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
05th August 2022, 12:18 am
मूळ तक्रारदाराला प्रतिवादी करण्याचे खंडपीठाचे निर्देश

पणजी : मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात जमीन व्यवहारप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत दुरुस्ती करून मूळ तक्रारदाराला प्रतिवादी करण्याचा निर्देश खंडपीठाने दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.

याचिकेत आरोलकर यांनी राज्य सरकार, आर्थिक गुन्हा विभागाचे पोलीस निरीक्षक आणि पेडणेच्या पोलीस निरीक्षकांना प्रतिवादी केले आहे. या प्रकरणी संध्या बांदेकर यांनी २६ आॅक्टोबर २०२० रोजी पेडणे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, धारगळ येथील सर्व्हे क्र. ४८१ चे दोन मालक आहेत. यातील म्हापसा येथील विद्या नाटेकर व संजय नाटेकर या मालकांची पाॅवर आॅफ अॅटर्नी जीत आरोलकर यांच्याकडे, तर रवळू खलप व प्रकाश खलप यांची पाॅवर आॅफ अॅटर्नी संध्या बांदेकर यांच्याकडे आहे. आरोलकर यांनी या जमिनीची विभागणी न करताच खोटी कागदपत्रे सादर करून जमिनीचे प्लॉट केले आणि विक्री करून २५ ते ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी ३० ऑक्टोबर २०२० रोजी आरोलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आरोलकर यांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने २५ हजार रुपये व इतर अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. नंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले.

हे प्रकरण दिवाणी स्वरुपाचे असून त्याबाबत दिवाणी न्यायालयात खटला सुरू अाहे. असे असताना राजकीय दबाव वापरून आपल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा करून गुन्हा रद्द करण्यासाठी आमदार आरोलकर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली असता, यात तक्रारदार संध्या बांदेकर यांना प्रतिवादी करण्याचा निर्देश खंडपीठाने जारी केला आहे. 

हेही वाचा