जेमिमाची शानदार खेळी

पहिल्या टी-२० सामन्यात भारताची श्रीलंकेवर मात

|
23rd June 2022, 11:06 Hrs
जेमिमाची शानदार खेळी

दंबुला : भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत विजयी सुरुवात केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गुरुवारी दंबुला येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या टी-२०मध्ये ३४ धावांनी विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेचा संघ ५ गडी गमावून १०४ धावा करू शकला.

५व्या क्रमांकावर फलंदाजी करताना जेमिमा रॉड्रिग्जने २७ चेंडूत ३६ धावांची नाबाद खेळी खेळली आणि तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. संघात पुनरागमन करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी जेमिमाने पार पाडली. तिने नाबाद खेळीत ३ चौकार आणि १ षटकार ठोकला. दुसऱ्या टोकाला दीप्ती शर्माने ८ चेंडूत १७ धावा जोडल्या. या विजयासह भारतीय महिला संघाने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा टी-२० सामना या मैदानावर २५ जून रोजी होणार आहे.

१३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या  कविशा दिलहरीने सर्वाधिक ४७ धावा केल्या आणि नाबाद माघारी परतली. तिने ४९ चेंडूत ६ चौकार मारले. १ धावांच्या सांघिक धावसंख्येवर श्रीलंकेला पहिला धक्का विश्मी गुणरत्नेच्या (१२) रूपाने बसला. त्यानंतर फिरकीपटू राधा यादवने डावाच्या ७व्या षटकात श्रीलंकेला दुसरा धक्के दिला.

कर्णधार चमारी अटापट्टूला (१६) राजेश्वरी गायकवाडने तर हर्षिता माधवीला (१०) दीप्ती शर्माने झेलबाद केले. निलाक्षी डी सिल्वा ८, अमा कांचना ११ आणि यष्टीरक्षक अनुष्का संजीवनीने नाबाद १० धावांचे योगदान दिले. भारताकडून राधा यादवने २२ धावांत २ तर दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकार आणि शेफाली वर्मा यांनी १-१ बळी घेतला.

तत्पूर्वी, जेमिमा रॉड्रिग्जने २७ चेंडूत ३६ धावा करून पुनरागमन केले आणि श्रीलंकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर भारतीय महिला संघाने ६ बाद १३८ धावा केल्या. भारताची नवीन ऑल फॉरमॅट कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण तिच्याऐवजी श्रीलंकेने स्वप्नवत सुरुवात केली.

डावाच्या तिसऱ्याच षटकात भारताने सलामीवीर स्मृती मानधना (१२) हिची विकेट गमावली. २५ वर्षीय भारतीय खेळाडू मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात अनुभवी ओशाडीची बळी ठरली. ती शॉट खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू थेट मिडऑनला कॅप्टन अटापट्टूच्या हाती लागला. एस मेघनाला खातेही उघडता आले नाही आणि अनुभवी रणसिंगने तिला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. उष्ण आणि दमट वातावरणात सुरुवातीला दोन गडी गमावल्यानंतर संघावर दबाव स्पष्टपणे दिसत होता.

हरमनप्रीत आणि शेफाली वर्मा या जोडीने ही नाजूक परिस्थिती हाताळली. शेफाली (३१ धावा) बाद होणारी तिसरी खेळाडू होती, जिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना अटापट्टूने झेलबाद केले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत त्यांना लवकर मोठी विकेट मिळवून दिली आणि ११व्या षटकात ऑफस्पिनर इनोका रणवीराच्या गोलंदाजीवर कर्णधार हरमनप्रीत (२२) एलबीडब्ल्यू आऊट झाल्यामुळे हे घडले. रणवीराने यष्टिरक्षक रिचा घोष (११) आणि पूजा वस्त्राकर (१४) यांचेही बळी घेतले.