
प्रतिनिधी। गोवन वार्ता
बेळगाव : देवाची अतिभक्ती कधीकधी भक्ताच्या जीवावर बेतत असते. असाच प्रकार नुकताच बेळगाव शहरात घडला. देवभक्तीत तल्लीन झालेल्या एका भक्ताने बाळकृष्णाची पितळेची मूर्ती गिळली होती. त्यामुळे मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या या भक्ताला बेळगाव येथील केएलई इस्पितळाच्या डॉक्टरांनी आज (गुरुवारी) सहीसलामत बाहेर काढले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव परिसरातील ४५ वर्षीय पुरुष रोज रात्री देव पाण्यात ठेवायचा आणि सकाळी उठून ते पाणी प्राषण करायचा. दोन दिवसांपूर्वी देव ठेवलेले पाणी पिताना त्या पाण्यातून मूर्ती बाहेर काढण्यास तो विसरला. पाण्यासोबत त्याने बाळकृष्णाची पितळेची मूर्तीही प्राषण केली. त्यानंतर त्याच्या गळ्यात दुखू लागले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले. स्थानिक डॉक्टरांनी त्याचे एक्स-रे काढल्यानंतर त्याच्या गळ्यात बाळकृष्णाची मूर्ती अडकल्याचे दिसून आले.
स्थानिक डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्याला बेळगाव येथील केएलई इस्पितळात पाठवले. त्यानुसार तो इस्पितळात दाखल झाला. तेथील डॉ. प्रीती हजारे, डॉ. विनिता मेटगुडमठ आणि डॉ. चैतन्य कामत यांच्या वैद्यकीय पथकाने आज एन्डोस्कोपीच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या गळ्यात अडकलेली मूर्ती बाहेर काढली. आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.