म्हापशात डेंग्यूचे सात रुग्ण

आरोग्य केंद्र दक्ष; अनेक भागांत औषध फवारणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd June 2022, 12:14 Hrs
म्हापशात डेंग्यूचे सात रुग्ण

म्हापसा : गेल्या महिन्याभरात शहरात डेंग्यूचे सात रुग्ण आढळून आल्याने म्हापसा नागरी आरोग्य केंद्र दक्ष झाले आहे. केंद्राने डास प्रतिबंधक फवारणीसह जनजागृती मोहिमेवर भर दिला आहे. साखळी, फोंडा यानंतर म्हापशात रुग्ण आढळून लागल्याने डेंग्यूचा फैलाव हळूहळू वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
म्हापशाच्या कुचेली, करासवाडा, गावसावाडा, पेडे व शेळपे या भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून नागरी आरोग्य केंद्राने रुग्ण आढळलेल्या परिसरात डास प्रतिबंधक फवारणी, स्वच्छता मोहीम व जागृती उपक्रम राबविले आहेत.
आरोग्य केंद्राधिकारी डॉ. शॅरल डिसोझा व आरोग्य स्वच्छता निरीक्षक उदय ताम्हणकर यांच्या निरीक्षणाखाली आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून नियमित जागृत आणि स्वच्छता उपक्रम राबवणे, घरोघरी जनजागृती करणे, प्रतिबंध करण्यासाठी काय करावे व काय करू नये, याविषयी माहिती पत्रकांचे वाटप केले जात आहे. शिवाय या प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक काळजी घेतली जात आहे.
येथील आरोग्य केंद्राकडे म्हापशातील वेगवेगळ्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिनाभराच्या काळात सात रुग्ण सापडले असून त्याला अटकाव करण्यासाठी आम्ही नियमितपणे मोहीम राबवली आहे, असे डॉ. डिसोझा यांनी म्हटले आहे.

यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट!

पणजी : गेल्यावर्षी १ जानेवारी ते ३१ मे या पाच महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूचे १०८ सक्रीय रुग्ण होते. यंदा आत्तापर्यंत केवळ ६२ सक्रीय रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे यंदा डेंग्यूची रुग्णसंख्या घटल्याचे स्पष्ट होते, अशी माहिती आराेग्य खात्याच्या मुख्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली. सध्या अनेकांना वातावरणातील बदलांमुळे थंडी, ताप अशी लक्षणे आहेत. सध्या त्यांना संशयित रुग्ण म्हटले जाते. याचा अर्थ त्यांना डेंग्यू आहे, असे होत नाही. त्यांचा अहवाल आल्यानंतर निश्चित सक्रीय रुग्णसंख्या समजणार आहे, असे डॉ. महात्मे यांनी म्हटले आहे.
...........