रविचंद्रन अश्विनला करोनाची बाधा

कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका

|
22nd June 2022, 12:08 Hrs
रविचंद्रन अश्विनला करोनाची बाधा

आर. अश्विन

दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही. काही खेळाडू वगळता संपूर्ण संघ १६ जून रोजी इंग्लंडला रवाना झाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरही इंग्लंडला रवाना झाले.
दरम्यान, टीम इंडियाला २४ जूनपासून लिसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. मात्र, या सामन्यात अश्विन संघाचा भाग असणार नाही. इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना १ जुलैपासून खेळवला जाणार आहे. दरम्यान, गेल्यावर्षी करोनामुळे मालिकेचा शेवटचा सामना रद्द करण्यात आला होता. त्यावेळी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फिजिओ नितीन पटेल आणि सहाय्यक फिजिओ योगेश परमार हे करोना पॉझिटिव्ह आढळले होते.
या मालिकेत ४ कसोटी सामने खेळले गेले आणि भारतीय संघ २-१ ने पुढे होता. त्यावेळी संघाचा कर्णधार विराट कोहली होता. त्याच वेळी रवी शास्त्री संघात प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते. आता संघाची कमान रोहित शर्माच्या हातात असून संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आहे.
करोना प्रोटोकॉलनंतर अश्विन इंग्लंडला रवाना
टीम इंडियाला १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे. अश्विनला इंग्लंडमध्ये पोहोचण्यापूर्वी करोना प्रोटोकॉलचे नियम पूर्ण करावे लागतील. त्यानंतरच तो कसोटी सामन्यासाठी संघासह उपलब्ध होईल. बीसीसीआयने सांगितले की, आर अश्विन संघासोबत यूकेला जाऊ शकला नाही. कारण तो जाण्यापूर्वी करोना पॉझिटिव्ह आढळला होता. अश्विन नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. तो आयपीएलचा अंतिम सामनाही खेळला होता. आयपीएलमधील बायो-बबलचाही तो भाग होता. मात्र, येथून बाहेर पडल्यानंतरच तो करोनाच्या विळख्यात आला.