गुजरातला राजस्थानचे तगडे आव्हान

ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर आज पहिली क्वालिफायर : पावसाची शक्यता

|
23rd May 2022, 11:49 Hrs
गुजरातला राजस्थानचे तगडे आव्हान

कोलकाता : ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर मंगळवारी होणाऱ्या क्वालिफायर-१ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या नजरा कोलकाता ते अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यावर असेल. एकीकडे राजस्थान रॉयल्स दुसऱ्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी उत्सुक आहे, तर दुसरीकडे गुजरात टायटन्स पहिल्या स्थानावर कब्जा करण्यासाठी प्रयत्नरत आहे. दरम्यान, तीन वर्षांनंतर आयपीएलचे दोन शानदार सामने आयोजित करण्यासाठी ईडन सज्ज झाले आहे.
दोन्ही संघांना कमी लेखणे योग्य नाही
गुजरात आणि राजस्थानसाठी दिलासादायक बाब म्हणजे बाद फेरीतील पहिला सामना गमावल्यानंतरही त्यांना दुसरी संधी मिळणार असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २७ मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-२ द्वारे ते त्याच मैदानावर २९ मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत पोहोचू शकतात. दरम्यान, गुजरात-राजस्थानमधून कोणालाही कमी लेखणे योग्य ठरणार नाही. साखळी फेरीत चमकदार कामगिरी करून दोन्ही संघ आरामात प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने साखळी फेरीतील १४ पैकी १० सामने जिंकले, तर राजस्थाननेही ९ सामने जिंकले. गुजरातच्या बाजूने एक गोष्ट निश्चितच आहे, ती म्हणजे साखळी फेरीत त्यांनी राजस्थानचा ३७ धावांनी पराभव केला. याबाबतीत, ते मानसिकदृष्ट्या एक पाऊल पुढे आहे.
ऑरेंज-पर्पल शर्यतीत बटलर-चहल आघाडीवर
राजस्थानने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीच्या जोरावर प्लेऑफ गाठले आहे. जोस बटलरची ऑरेंज कॅप आणि युझवेंद्र सिंग चहलची पर्पल कॅप शर्यतीत आघाडीवर आहे, हे स्पष्टपणे दर्शवते. बटलरने १४ सामन्यांमध्ये ६२९ धावा (तीन शतके आणि तीन अर्धशतके) केल्या आहेत, तर चहलनेही तेवढ्याच सामन्यांमध्ये २६ बळी घेतले आहेत. चहल आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज होण्यापासून फक्त दोन विकेट दूर आहे. तिसऱ्या क्रमांकावर अमित मिश्राने १६६ विकेट्स घेतल्या आहेत तर चहलच्या नावावर १६५ विकेट्स झाल्या आहेत. त्याचवेळी, या संघाचा सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनही पियुष चावला (१५७ बळी) यांना मागे टाकत आयपीएलमधील सर्वाधिक बळी घेणारा पाचवा गोलंदाज होण्यापासून केवळ दोन विकेट्स दूर आहे. अश्विनच्या नावावर सध्या १५६ बळी आहेत. या मोसमात त्याने आतापर्यंत ११ विकेट घेतल्या आहेत. संघ व्यवस्थापनालाही अश्विनकडून फलंदाजीच्या मोठ्या आशा आहेत.
राशिद-सामीवर सर्वांचा लक्ष
दुसरीकडे, साखळी फेरीत १८-१८ बळी घेणारा गुजरातचा फिरकी गोलंदाज राशिद खान आणि वेगवान गोलंदाज मुहम्मद सामी यांना विसरणे निरर्थक ठरेल. इडन हे सामीचे होम ग्राउंडही आहे. तो येथे नवीन चेंडूने चमत्कार करू शकतो. दुसरीकडे, गुजरातच्या फलंदाजांना राजस्थानचे वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्ट यांच्यापासून सावध राहावे लागेल, ज्यांनी या हंगामात आतापर्यंत अनुक्रमे १५ आणि १३ बळी घेतले आहेत.
कर्णधारांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
थेट अंतिम फेरी गाठायची असेल तर दोन्ही कर्णधारांनाही ताकद दाखवावी लागेल. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने १३ सामन्यांत ४१३ धावा केल्या आहेत. राजस्थानविरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यात पांड्याने ५२ चेंडूत ८७ धावांची शानदार खेळी खेळली. दुसरीकडे संजू सॅमसनची 'कर्णधारी खेळी' अजून यायची आहे. गुजरातचा युवा शुबमन गिलनेही धावा केल्या आहेत. मात्र, तो गेल्या दोन सामन्यांत अपयशी ठरला आहे. मोठ्या सामन्यात संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. गुजरातचा डेव्हिड मिलर गोलंदाजांसाठी केव्हाही किलर ठरू शकतो. 
साहाच्या दुखापतीने गुजरात हैराण
गुजरातचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाची दुखापत हा चिंतेचा विषय आहे. रिद्धिमान दुखापतीमुळे चेन्नईविरुद्धचा सामना खेळू शकला नाही, जरी संघ व्यवस्थापनाला आशा आहे की तो सामन्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होईल. इडन हे रिद्धिमानचे होम ग्राउंड देखील आहे. रिद्धिमानने नऊ सामन्यांत तीन अर्धशतके झळकावली आहेत.
प्ले-ऑफवर पावसाचे सावट; नवे नियम लागू
आयपीएल २०२२ चा पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना कोलकात्याच्या इडन गार्डनवर मंगळवारी आणि बुधवारी होणार आहे. कोलकात्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून पाऊस आणि वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. स्टेडियमचा प्रेस बॉक्सलाही याचा फटका बसला आहे. पुढचे काही दिवस इकडे असंच हवामान असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाच्या शक्यतेमुळे हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.