नागवा-हडफडे येथील स्क्रॅपयार्डला आग

|
08th May 2022, 11:36 Hrs

म्हापसा : नागवा-हडफडे येथील स्क्रॅपयार्डला शनिवारी मध्यरात्री आग लागल्याने सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. या आगीत स्क्रॅपसह दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.
पिळर्ण अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री ११.५४च्या सुमारास लेझी-बी हॉटेलच्या परिसरातील एका स्क्रॅपयार्डला आग लागल्याची माहिती दलास मिळाली. जवानांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. गोपाळ नाईक यांच्या मालकीच्या स्क्रॅपयार्डस ही आग लागली होती.
या आगीत स्क्रॅपयार्ड येथे पार्क केलेले वाहन टाटा एस (जीए ०३ के ०७८६) ही गाडी पूर्णतः जळाली. तर दुसरी महिंद्रा मॅक्सिमो (जीए ०८ यु ५७४४) या गाडीचे अशंतः नुकसान झाले. शिवाय काही स्क्रॅप मालही जळाला. या आगीमुळे जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले. मात्र, या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.