सोझा लोबो रेस्टॉरंटवर हल्ला प्रकरणी आणखी चार संशयितांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January 2022, 11:27 Hrs
सोझा लोबो रेस्टॉरंटवर हल्ला प्रकरणी  आणखी चार संशयितांना अटक

पणजी : कळंगुट किनाऱ्याजवळील हँगओव्हर तथा सोझा लोबो रेस्टॉरंटवर मंगळवारी रात्री सुमारे ६० ते ७० जणांनी हल्ला केला होता. या प्रकरणात गुन्हा शाखेने मोहम्मद उर्फ लिंबू नदाफ (२०, मूळ हावेरी - कर्नाटक), सुरज कुमार सिंग (२१, मूळ छांबा - हिमाचल प्रदेश), पंकज सिंग (२७, मूळ छांपावत - उत्तराखंड) आणि रोहित मिंज (२९, मूळ सुंदरगड - ओडिसा) या चार जणांना अटक केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात १५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चारही संशयितांना गुरुवारी म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.             

सोझा लोबो रेस्टॉरंटवर मंगळवारी रात्री सुमारे ६० ते ७० जणांनी हल्ला करून तोडफोड केली होती. त्यानंतर यात सहभाग असलेला मुख्य संशयित गजेंद्र सिंग याच्यासह दोघांना  कळंगुट पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण बुधवारी रात्री गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर शाखेने  आणखीन सहा जणांना गेल्या गुरुवारी रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा शाखेने अधिक तपास करून मुख्य संशयित सुनील भोमकर याला अटक केली. 

या प्रकरणात गुन्हा शाखेने मंगळवारी मध्यरात्री मोहम्मद उर्फ लिंबू नदाफ या संशयिताला अटक केली होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळी सूरज कुमार सिंग, पंकज सिंग आणि रोहित मिंज या तिघा संशयितांना अटक केली. पोलीस कोठडीसाठी गुरुवारी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी अटक केलेले मुख्य संशयित गजेंद्र सिंग आणि सुनील भोमकर याच्यासह संतोष दास, राहुल, सोहेल राणा, पुश्पेंद्र मीना आणि सुरेंद्र राठोड या सात जणांनी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवार ६ रोजी होणार आहे.             

या प्रकरणी गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल परब पुढील तपास करत आहेत.