ममतांना रोखण्यासाठी ‘जय श्रीराम’!

भाजपने झळकावले होर्डिंग्ज; बॅनर्जींची आज तीन मंदिरांना भेट

|
28th October 2021, 11:14 Hrs
ममतांना रोखण्यासाठी ‘जय श्रीराम’!

फोटो : राज्यात ठिकठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग्ज.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून रंगलेला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तृणमूलला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सोशल मीडियावर ‘जय श्रीराम’ पोस्टरची मोहीम चालवली. शिवाय अनेक ठिकाणी होर्डिंग्जही झळकावले. दरम्यान, तृणमूलच्या अध्यक्ष तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी गोव्यात दाखल झाल्या आहेत.
गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’च्या मदतीने निवडणूक तयारीस वेग दिला. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांना फोडून पक्षात आणल्यानंतर तृणमूलने आक्रमकरीत्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली. राज्यातील अनेक भागांत ‘गोंयची नवी सकाळ’चे होर्डिंग्ज झळकावले. यातूनच सत्ताधारी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये युद्ध सुरू झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कार्टुन्स प्रसिद्ध केल्याचा दावा करत प्रदेश भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी तृणमूल आणि ममता बॅनर्जी यांचा निषेध केला. भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसने अनेक ठिकाणी लावलेले पोस्टर्स हटवले. शिवाय त्यांनी ममता बॅनर्जी यांची सभाही उधळून लावण्याचा इशारा दिला होता.
पोस्टर, कार्टुन्स यावरून भाजप आणि तृणमूलमध्ये वाद उफाळलेला असतानाच गुरुवारी ममता बॅनर्जी गोव्यात दाखल होणार असल्याचे निश्चित होताच भाजपने दाबोळी विमानतळापासून ते पणजीपर्यंत अनेक ठिकाणी ‘जय श्रीराम’ असलेले होर्डिंग्ज लावून त्यांचा निषेध नोंदविला. दिवसभर भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरही ‘जय श्रीराम’ची मोहीम सुरू ठेवली. ममता बॅनर्जी विमानतळावरून निवासस्थानी जात असताना काही हिंदू संघटनांनी त्यांना काळे बावटे दाखवून त्यांचा निषेध करण्याचाही प्रयत्न केला. ममता शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस गोव्यात असल्याने भाजप आणि तृणमूलमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
.............................................

भाजपचे ख्रिस्ती मंत्री, आमदार धास्तावले!
- तृणमूल आणि ममता बॅनर्जी यांच्या निषेधासाठी भाजपने ‘जय श्रीराम’ची मोहीम चालवली; पण हा डाव भाजपवरच उलटण्याची दाट शक्यता आहे.
- गोव्यात यापूर्वी कधीही धर्माच्या नावावर राजकारण केले गेले नाही. अशा परिस्थितीत भाजपने आक्रमक पवित्रा घेत धार्मिक राजकारण सुरू केल्याने भाजपमधील ख्रिस्ती मंत्री, आमदार धास्तावले आहेत. त्यांच्या समर्थकांकडून भाजपच्या या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
- भाजपने गुरुवारी चालवलेल्या मोहिमेवरून पक्षाचे काही ज्येष्ठ नेतेही नाराज झाले आहेत. तृणमूलमार्फत निवडणूक रण​नीती आखत असलेल्या प्रशांत किशोर यांनी गोव्यात भाजपला धार्मिक राजकारणात अडकवण्यासाठी फासे टाकलेले होते. त्यात भाजप आपोआपच अडकला आहे. याचा भाजपलाच फटका बसू शकतो, असे या नेत्यांचे मत आहे.
- पुढील काळात तृणमूल काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्याकडून आक्रमक राजकारण केले जाईल. त्याला प्रत्युत्तर आक्रमकतेने न देता शांत राहून भाजप आणि सरकारने आपले काम पुढे नेणे गरजेचे आहे, असेही काही नेत्यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले.
...............................................
ममतांकडून भाजपला ‘चेकमेट’
भाजपने आखलेल्या रणनीतीला ‘चेकमेट’ म्हणून ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी राज्यातील धार्मिक स्थळांना भेटी देण्यावर भर दिला आहे. सकाळी पक्षातील नेत्यांची बैठक आणि दुपारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्या मंगेशी, महालसा नारायणी आणि तपोभूमीला भेट देणार आहेत, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. दोन दिवसांत ममता मच्छीमार संघटनेसह इतर काही संघटनांच्याही बैठका घेणार असल्याचे समजते.