नीरज चोप्रासह ११ खेळाडूंची ‘खेलरत्न’साठी शिफारस

क्रिकेटपटू मितालीसह पैलवान दाहिया, फुटबॉलपटू सुनील छेत्रीचा समावेश


27th October 2021, 11:55 pm
नीरज चोप्रासह ११ खेळाडूंची ‘खेलरत्न’साठी शिफारस

नवी दिल्ली : देशातील खेळाडूंसाठी सर्वात मानाचा पुरस्कार असणाऱ्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे समोर आली आहेत. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीने ही माहिती दिली. या माहितीनुसार शिफारस करण्यात आलेल्यांमध्ये टोकियो ऑलिम्पिकमधील पदकविजेत्यांसह भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, पैलवान रवी दाहिया, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री अशा एकूण ११ खेळाडूंची नावे आहेत.
खेलरत्न पुरस्काराला काही दिवसांपूर्वीच राजीव गांधीचे नाव हटवून माजी दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले होते. त्यानंतरचा हा पहिलाच पुरस्कार वितरण सोहळा आहे. यावेळी खेलरत्नसाठी सुवर्णपदक विजेच्या नीरज चोप्रासह, पैलवान रवी दहिया, हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीदेश, बॉक्सर लवलिनासह, क्रिकेटर मिथाली राज आणि फुटबॉलर सुनील छेत्री अशा काही दिग्गजांची नावे सूचवण्यात आली आहेत. दरम्यान, काही पॅराअॅथलिट्सचीही नावे या यादीत आहेत.
टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेमुळे यंदा खेलरत्न पुरस्काराची घोषणा लांबणीवर पडली होती. गेल्या वर्षी ५ खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव मोठे करणाऱ्या ४ पदक विजेत्यांचा तर टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या ५ खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या निवडीसाठी गठीत केलेल्या समितीने ११ खेलरत्न पुरस्कारांसह ३५ अर्जुन पुरस्कारांचीही घोषणा केली आहे.

खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आलेले खेळाडू
नीरज चोप्रा (भालाफेक), रवी दहिया (कुस्ती), पीआर श्रीजेश (हॉकी), लवलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फुटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत (बॅडमिंटन), सुमित अंतील (भालाफेक), अवनी लेखरा (शूटींग), कृष्णा नागर (बॅडमिंटन), एम नरवान (शूटींग).      

धवनसह ३५ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
अर्जुन पुरस्कारासाठी क्रिकेटर शिखर धवनसह संपूर्ण हॉकी संघासह ३५ खेळाडूंची टोकियो पॅराएथलिट्सचाही समावेश आहे. यामध्ये सुहास एलवाई, भाविना पटेल यांची नावे सामील आहेत. तर भारतीय पुरुष हॉकी संघाने यंदा कांस्य पदक जिंकल्यामुळे संपूर्ण संघाला अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे.