हिजबुल्लाहची नांगी ठेचण्यासाठी इस्रायल सज्ज

Story: विश्वरंग/ संतोष गरुड |
20th October 2021, 12:17 Hrs
हिजबुल्लाहची नांगी ठेचण्यासाठी इस्रायल सज्ज

अमेरिकेच्या सल्ल्यानंतर इस्रायलने मे २०२१ मध्ये हमासशी सुरू केलेले युद्ध थांबवल्यानंतर आणि ३० ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानमधून अमेरिकेने आपले सैनिक मागे घेतल्यानंतर इस्लामिक दहशतवादी संघटनांच्या अंगात बळ संचारले आहे. अफगाणिस्तान तालिबानी संघटनेने ताब्यात घेतल्यानंतर सर्व दहशतवादी संघटना एकजूट होताना दिसत आहेत. या संघटनांचा हेतू एकच... अन्य देशांचे भूभाग गिळंकृत करत इस्लामची स्थापना करणे. याच कारणाने आता पुन्हा लेबनान आणि इस्रायल यांच्यात युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. 

अमेरिकेच्या परराष्ट्रनितीमुळे मध्य आशियातील देशांमध्ये सतत उलथापालत होत असते, यात नावीन्य नाही. या धोरणामुळे इस्लामिक दहशतवादाला खतपाणीही मिळत राहिले आहे, हा आजवरचा इतिहास आहे. म्हणूनच अमेरिकन धोरणामुळेच जागतिक स्तरावरील दहशतवाद समूळ नष्ट होत नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यांचीच पुनरावृत्ती आता पहायला मिळत आहे. मे २०२१ मध्ये पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून गाजापट्टीतून ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने थेट इस्रायलवर क्षेपणास्रे डागली होती. इस्रायलने त्याला सडेतोड उत्तर दिले होते. अमेरिकेच्या सूचनेनंतर इस्रायलने युद्धविरामाची घोषणा केली होती. आता दोन दिवसांपासून लेबनानच्या हिजबुल्लाह या क्रूर दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला करण्याची तयारी केल्याचे वृत्त येत आहे. अर्थातच याचा मुकाबला करण्यासाठी इस्रायलही सज्ज झाला आहे. इस्रायलला युद्ध नवीन नाही. ‘आम्हाला युद्ध नको, पण कोणी युद्ध थोपण्याचा प्रयत्न केला तर, त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल’, असा इशारा इस्रायलचे लष्कर प्रमुख युरी गोर्डिन यांनी दिला आहे. 

यापूर्वी २००६ मध्ये हिजबुल्लाह संघटनेने इस्रायलशी युद्ध छेडले होते. त्या युद्धात इस्रायलचे १६० सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्याल प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने संघटनेच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला होता. त्यात १ हजार २०० जणांचा मृत्यू झाला होता. त्यात सामान्य नागरिकांचाही समावेश होता. तरीही हिजबुल्लाहची खुमखुमी कमी झालेली नाही, हे आता स्पष्ट झालेले आहे. अर्थात हिजबुल्लाहची निर्मितीच इस्रायल नष्ट करण्यासाठी झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न युद्धाशिवाय सुटणारा नाही. या प्रश्नाचे मूळही पॅलेस्टाईनशी निगडीत आहे. जेव्हा यहुदींनी इस्रायलमध्ये आपली मूळ भूमी परत मिळवली, तेव्हा अनेक मुसलमानांनी तेथून पळ काढला होता. त्यातील काहीजण लेबनानमध्ये शरणार्थी म्हणून गेले होते. तेव्हा लेबनानमध्ये ख्रिस्ती नागरिक होते. त्यांनी शरणार्थींना आश्रय दिला. कालांतराने याच शरणार्थींनी स्वतःचे संघटन बनवले आणि ख्रिस्ती नागरिकांवर अत्याचार सुरू केले. यातील अनेक ख्रिस्त्यांनी इस्रायलचा आसरा घेतला. त्यानंतर इस्रायलने लेबनानवर आक्रमण करून १९८२ मध्ये दक्षिण लेबनानच्या भूभागावर आपले वर्चस्व स्थापित केले. याच करणाने १९८५ साली कट्टर शिया मुस्लिमांनी हा भूभाग स्वतंत्र करण्यासाठी हिजबुल्लाह नावाची संघटना स्थापन केली. तेव्हपासून इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. याच हिजबुल्लाह संघटनेने भारतालाही पंधरा दिवसांपूर्वी धमकी दिली आहे. 

कश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी आणि ‘गजवा ए हिंद’ लागू करण्यासाठी हल्ला करण्याची तयारी त्यांनी केली आहे. अशा संघटनांना ठेचून काढण्यासाठी अमेरिकेच्या भरवशावर न राहता भारतानेही इस्रायलसारखी तयारी करणे, काळाची गरज आहे.