भारताचा दुसरा सराव सामना आज कांगारूंशी

वॉर्नरच्या कामगिरीकडे लक्ष : दुखापतीमुळे इंग्लंडचा संघ चिंतेत


19th October 2021, 10:01 pm
भारताचा दुसरा सराव सामना आज कांगारूंशी

दुबई : भारताने आपल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. आता त्यांना त्यांच्या पुढील सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागेल. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियासाठी एक चांगली बातमी येत असल्याचे दिसत आहे, तर भारतासाठी ही चिंतेची बाब असेल. 

ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम अष्टपैलू मार्कस स्टोइनिस परत येऊ शकतो. तो गोलंदाजी करताना दिसू शकतो. स्टोइनिस स्नायूंच्या दुखापतीमुळे त्रस्त होता, त्यामुळे तो आयपीएल २०२१ मध्ये खेळू शकला नाही. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. त्याने परतल्यानंतरच फलंदाजी केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सोमवारी अबुधाबीमध्ये खेळलेल्या सराव सामन्यात त्याने २३ चेंडूत २८ धावा केल्या. आता स्टोइनिसने म्हटले आहे की, तो भारताविरुद्धच्या पुढील सराव सामन्यात गोलंदाजी करताना दिसू शकतो.

सामन्यानंतर स्टोइनिस म्हणाला, मी आज गोलंदाजी केली नाही, पण चांगले चालले आहे. मला वाटते की ते योग्य मार्गावर आहे आणि मी तयार आहे. मला वाटते की मी पुढच्या सामन्यात गोलंदाजी करू शकतो. स्टोइनिसने गोलंदाजी करणे ऑस्ट्रेलियासाठी मोठा दिलासा असेल. सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार मुख्य गोलंदाज आणि मिचेल मार्शच्या रूपात अष्टपैलू खेळवला, जे खूप महागडे ठरले. स्टोइनिसने या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथसोबत ४८ धावांची भागिदारी केली. 

स्मिथसोबतच्या भागिदारीबद्दल स्टोइनिस म्हणाला, मला वाटते की ही एक चांगली सुरुवात होती. आम्ही काही काळ एकत्र खेळलो नाही. पहिला विजय मिळवणे चांगले होते. आम्ही दोघांनी काही नवीन गोष्टी करून पाहिल्या.

असा होता सामना

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत सात गडी गमावून १५८ धावा केल्या. त्याच्या पहिल्या फळीतील फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. मार्टिन गुप्टिलने २० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या. डार्ली मिशेलने २२ चेंडूत ३३ धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सनच्या बॅटमधून ३७ धावा आल्या. तर जेम्स नीशमने ३१ धावा केल्या. मात्र, संघाची खालची फळी चांगली कामगिरी करू शकली नाही आणि त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एक चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य सात गडी गमावून साध्य केले. डेव्हिड वॉर्नर पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला. यानंतर कर्णधार अॅरोन फिंच आणि मिशेल मार्श यांनी २४-२४ धावांची खेळी खेळली. स्मिथने ३५ धावा केल्या आणि स्टोइनिससोबत भागिदारी करून संघाला विजयापर्यंत नेले. सरतेशेवटी, अॅश्टन एगरने २३ धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवुडने संघाला विजयाचा उंबरठा ओलांडून दिला. स्टार्क १३ धावांवर नाबाद राहिला. जोशही आठ धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडचा लिव्हिंगस्टोन जखमी

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन बोटाच्या दुखापतीमुळे टी -२० विश्वचषक खेळणार की नाही याबाबत संशय निर्माण झाला आहे. लियाम लिव्हिंगस्टोन दुबईत भारताविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान जखमी झाला होता. इंग्लंड पुढील २४ तास त्याच्या दुखापतीचे निरीक्षण केल्यानंतरच निर्णय घेईल.