धक्कादायक! हुंड्यासाठी पती बनला नराधम

- घरात कोब्रा सोडून केली पत्नीची हत्या : केरळातील घटना

Story: दिल्ली : |
14th October 2021, 01:05 Hrs
धक्कादायक! हुंड्यासाठी पती बनला नराधम

नवी दिल्ली : देशात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना घडली आहे. केरळमध्ये एका व्यक्तीने सर्पदंश करून पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पती आता दोषी आढळला आहे. सूरज असे या आरोपीचे नाव असून, त्याने आपली पत्नी उथराची हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. केरळच्या कोल्लममध्ये ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ७ मे २०२० रोजी उथरा घरामध्ये झोपलेली असताना तिला कोब्रा चावला. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. यानंतर उथराच्या माहेरच्या मंडळींनी तिचा पती सूरजवर तिच्या हत्येचा आरोप केला होता. सूरजने पत्नीच्या खोलीत मुद्दाम कोब्रा सोडला होता; जेणेकरून तो चावल्यामुळे तिचा मृत्यू होईल. हा संपूर्ण कट रचण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले आहे की गेल्या वर्षीही सूरजने पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता.
तपासामध्ये सूरजने दोन वेळा साप पकडणाऱ्याला पैसे देऊन साप खरेदी केल्याचे समोर आले आहे. सूरजवर पत्नीच्या हत्येसोबतच घरगुती हिंसाचारासह अनेक आरोप लावण्यात आले आहेत. याप्रकरणी कोर्टाने त्याला दोषी ठरवले असून १३ ऑक्टोबर शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींमागे पैसा हेच कारण असल्याचे समोर आले आहे.
... तरीही समाधानी नव्हता!
सूरजला लग्नामध्ये भरपूर हुंडा देण्यात आला होता. यामध्ये रोख रक्कम, नवीन कार आणि सोन्याचे दागिने यासह अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. मात्र तरी देखील तो समाधानी नव्हता. तो सतत पैसे मागत असे. हुंड्यासाठी पत्नीचा छळ करायचा, असा आरोप उथराच्या कुटुंबीयांनी केला आहे. उथराच्या मृत्यूवरून तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयाच्या आधारे सूरजला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.