आमदार प्रसाद गावकर लवकरच तृणमूलमध्ये

बंधू संदेश गावकर यांच्यासह समर्थकांचा तृणमूलमध्ये प्रवेश

|
13th October 2021, 11:48 Hrs
आमदार प्रसाद गावकर लवकरच तृणमूलमध्ये

फोटो : प्रसाद गावकर
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढवली जाईल, असे म्हणणारे सांगेचे विद्यमान अपक्ष आमदार प्र​साद गावकर यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) समर्थन जाहीर केले आहे. तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे दोनापावला येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात अाली होती. यावेळी आमदार गावकर यांनी आपण लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करू, अशी घोषणाही केली.
मागील २०१७ ची विधानसभा निवडणूक प्रसाद गावकर यांनी सांगेतून अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांनी भाजपचे तत्कालीन आमदार सुभाष फळदेसाई यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता. आमदार प्रसाद गावकर यांनी प्रथम भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. काहीच महिन्यांनंतर सरकारला दिलेला पाठिंबा त्यांनी मागे घेतला व ते विरोधकांत सामील झाले. काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी आपले बंधू संदेश गावकर व समर्थकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला होता. त्यामुळे आगामी निवडणूक प्रसाद गावकर काँग्रेसच्या तिकिटावर लढतील, असे वाटत होते. पण, बुधवारी त्यांनी तृणमूल काँग्रेसला पाठिंबा जाहीर करून बंधू संदेश गावकर यांचा तृणमूलमध्ये प्रवेशही घडवून आणला. यामुळे सर्वांचेच डोळे विस्फारले.