आकाश मंगेशकर

सध्या सर्वत्र गाजणाऱ्या "मणिके मगे हिथे" या श्रीलंकन गाण्याचे कोंकणी भाषेत रूपांतर करून गाणाऱ्या आकाशने कित्येक गोमंतकीय युवामने जिंकली आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्युब चॅनलवर हे कोंकणी भाषेतून गायलेले गाणे खूपच वायरल झाले आहे. युट्यूबची जादूगिरी या सदरातून आकाशच्या युट्यूब चॅनलविषयी जाणून घेऊया…

Story: युट्यूबची जादूगिरी/ स्नेहल कारखानीस |
19th September 2021, 12:18 am
आकाश मंगेशकर

नवी मनाला जी एक स्वप्न बघण्याची खुमखुमी असते, ती या आभासी जगात पूर्ण होऊ शकते. हे लक्षात आले की असंख्य जण या सर्वातून एक स्वप्नवत जग उभे करू बघतात ज्यांना अशी स्वप्ने बघायची असतात त्यांच्यासाठी युट्यूबसारखे व्यासपीठ म्हणजे पर्वणीच आहे. अलीकडच्या काळात युट्यूबला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपले कलागुण लोकांसमोर यावे म्हणून धडपडणारा एक युवावर्ग तयार झाला आहे. नृत्य, नाट्य, गायन इत्यादी अनेक कलाविष्कार आपल्या युट्यूब चॅनलवर  प्रदर्शित करून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी अनेकजण आपापल्या परीने धडपडत आहेत. अशा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपली स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारा गोव्याचा आवाज म्हणजेच आकाश मंगेशकर.

संगीत हाच आत्मा. संगीत हेच विश्व. या तत्वावर ठाम राहून अखंड संगीताची साधना करणाऱ्या आकाशने आजवर केवळ संगीत याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून हिंदी-मराठी गाण्यांचे अनेक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले आहेत. आपल्या आवडीच्या गाण्याचा खोलवर अभ्यास करून ते रेकॉर्ड करून आपल्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करणे आणि लोकांचे मनोरंजन करणे यातच आकाश आपले सुख आणि समाधान मानतो.

गायकाचा एक स्वतःचा काळ असतो. त्याच काळात त्याला प्रतिसाद देखील मिळतो. पण काही मोजकेच गायक असे असतात, ज्यांची गाणी एका पिढी पुरती मर्यादित राहत नाहीत. त्यांचा आवाज हा प्रत्येक श्रोत्याला आपलासा वाटतो. संगीताशी प्रामाणिक असलेले आणि स्वरांसमोर नतमस्तक होणारे, अनेक गायक क्वचितच आढळतात. अशा गायकांना आपला आदर्श मानून संगीतक्षेत्रात आपला आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचवत अगदी कमी काळात आकाशने नावलौकिक प्राप्त केले आहे.

कलाकार हा आपल्या कलेद्वारे स्वतःचा उद्धार करतोच, पण रसिकांना आनंद देणे, ही बांधिलकी मानून कला प्रदर्शित करणारा कलाकार समाजप्रिय होतो. ही बाब लक्षात घेऊन आकाश आपल्या चाहत्यांना नेहमीच नवीन काहीतरी ऐकविण्याच्या तयारीत असतो आणि त्यासाठी त्याने आपला स्वतःचा "मंगेशकर स्टुडिओ" या नावाने रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू केला आहे. संगीतकलेविषयी असलेले निस्सीम प्रेम, गायनकलेची असलेली आवड आणि आपला आवाजच आपली ओळख आहे म्हणून आकाशने रेकॉर्डिंग विषयी अनेक गोष्टी शिकून, आत्मसाद करत, आपला आवाज स्वतःच्याच स्टुडिओत रेकॉर्ड करुन युट्यूबच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवला.

'कही दूर जब', 'तूने जो ना कहा',  'ओ सनम' 'सपना जहाँ',  'रिमझिम गिरे सावन', 'ए वतन', 'तेरा यार हूँ मैं', यासारखी कितीतरी मनोरंजनात्मक हिंदी गाणी व  जाँनिसार (सुशांत सिंग राजपूत), जीवन के दिन (ऋषी कपूर) ही श्रद्धांजलीपूर्वक गाणी सुध्दा आकाशने गायली आहेत. तसेच (अभी मुझमे कहीं) या हिंदी गाण्याच्या चालीवर "फोकाणा समजू नाका" हे करोना विषयक गाणे सुद्धा आपल्याला इथे ऐकायला मिळते. त्याचप्रमाणे डिंपल, मणिके मगे हिथे, मस्तानी, कौन तुझे,  यासारख्या अनेक हिंदी गाण्यांचे व्हिडिओ आकाशच्या युट्यूब चॅनलवर आपल्याला पहायला मिळतात. युट्यूब म्हणजे सातत्य आलेच आणि संगीत क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहणे खूप गरजेचे आहे. जे आकाश अखंडितपणे करतो. जसा काळ बदलतो, त्याप्रमाणे नवनिर्मिती होत असते. नवनवीन गाण्यांचा ट्रेंड चालू राहतो. याकडे आकाश अधिक गांभिर्याने लक्ष केंद्रित करतो आणि त्याच ट्रेंडींग गाण्यांना स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करुन आपल्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करतो. 

प्रत्येक कलाकार हा सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या कलेचा रसिक असतो. आपल्या कलेवर भरभरून प्रेम करत असतो. देवाने दिलेल्या देणगीचा आदर करत असतो. आपल्या कलेला व्यासपीठ मिळावे, आपल्या कलागुणांना रसिकमान्यता मिळावी म्हणून सातत्याने कार्यरत असतो. आपल्या कलेच्या माध्यमातून यशाची पायरी चढण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच युट्यूब वरील आपले व्हिडिओ कसे प्रभावी ठरतील याकडे आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर प्रत्येक कलाकार सतत कार्यरत असतो. आपल्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित केलेल्या प्रत्येक व्हिडीओमधून रसिकांचे मनोरंजन व्हावे आणि आपला आवाज लाखो श्रोत्यांपर्यंत पोहचावा हे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने आकाश ची वाटचाल सुरू आहे.

युट्यूब चॅनल म्हणजे सातत्याने कल्पक, सर्जनशील, नावीन्यपूर्ण  विचार करण्याची तयारी. सतत नवीन शिकण्याची इच्छा, आवड. माहिती घेऊन प्रयोग करण्याची मानसिकता. आणि जिद्द चिकाटी व प्रामाणिकपणे आपण निवडलेल्या क्षेत्रात काम करण्याची तयारी. प्रेक्षकांना नेहमीच नावीन्य हवे असते. तेच तेच बघणे किंवा ऐकणे लोकांना रुचेलच असे नाही. त्यामुळे आपल्या प्रेक्षक वर्गाची आपल्याकडून अपेक्षा ही वाढत असते. पण या सर्व गोष्टींना प्राधान्य देऊन आकाशने नेहमीच आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत; हे त्याच्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ वर आलेल्या प्रतिक्रियांवरुन दिसून येते. २०११ मध्ये सुरुवात केलेल्या आकाश मंगेशकर या युट्यूब चॅनलचे आजवर २.१३ हजार सबस्क्रिबर्स झाले आहेत. आपल्या गायनकलेला बळकट करत, गिटार, कीबोर्ड यासारखी वाद्ये शिकून स्वतःला संगीतसाथ करत हिंदी, मराठी, कोंकणी गाणी गुणगुणणाऱ्या आकाश मंगेशकरचे कौतुकास्पद अभिनंदन आणि पुढील संगीतमय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. समाजमाध्यमांच्या आधारे जगभरात आपला आवाज श्रोत्यांपर्यंत पोचावा असा मानस व्यक्त करणाऱ्या आकाशचे लवकरच हे स्वप्न साकार होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

https://youtube.com/c/AkashMangueshkar