गोकर्ण पर्तगाळी मठाधीशपदी विद्याधीशतीर्थ स्वामी विराजमान


30th July 2021, 11:53 pm
गोकर्ण पर्तगाळी  मठाधीशपदी विद्याधीशतीर्थ स्वामी विराजमान

विद्याधीशतीर्थ स्वामी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठात शुक्रवारी २४व्या मठाधीशपदी श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज विराजमान झाले. पर्तगाळ-काणकोण येथील केंद्रीय मठात शुक्रवारी त्यांचा पीठारोहण सोहळा झाला. वृंदावनस्थ २३वे गुरुस्वामी श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामींचे २४वे उत्तराधिकारी म्हणून ते या गुरुपीठावर विराजमान झाल्याने नवीन पर्वाचा शुभारंभ झाला.
२३ वे श्री गुरुस्वामी विद्याधिराज स्वामी सोमवार, १९ रोजी वृंदावनस्थ झाले होते. त्याच महान परंपरेतील २४व्या मठाधिपतीपदावर विद्याधीशतीर्थ श्रीपाद् वडेर स्वामी महाराज विराजमान झाले आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विद्याधीशतीर्थ स्वामी म्हणाले, विद्याधिराज स्वामींचे मार्गदर्शन शंभर वर्षे तरी लाभायला हवे होते. विद्याधिराज स्वामींचे सात वर्षांचे सानिध्य लाभले. आज जबाबदारी वाढली आहे. गुरू स्वामींनी शेकडो वर्षांपासूनची मठाची परंपरा सांभाळली आहे. गुरुस्वामींकडून मिळालेली अनुभवाची शिदोरी आपणास मठाचा कारभार चालवताना उपयोगी पडेल, असे त्यांनी सांगितले. स्वामींचे जे संकल्प अपुरे राहिले आहेत ते पूर्ण करणार असे सांगून सर्वांचे भले होवो, असा आशीर्वाद यावेळी स्वामींनी आशीर्वचन भाषणात दिला.
श्रीमद् विद्याधीशतीर्थ हे बेळगावी येथील वेदमूर्ती लक्ष्मीनारायण व पद्मावती भट यांचे द्वितीय पुत्र. त्यांचे पूर्वीचे नाव उदय भट शर्मा. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९९५ रोजी झाला. गोविंदराय सक्सेरिया या. पी.यू. महाविद्यालयातून त्यांनी पदवीपूर्व विज्ञान शाखेतील शिक्षण घेतले. श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामींनी आपले उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केल्यानंतर त्यांना पर्तगाळी येथे संन्यासाश्रमाची दीक्षा देण्यात आली होती. कोकणी ही विद्याधीशतीर्थ स्वामींची मातृभाषा असून कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषा त्यांना अवगत आहेत.

दरम्यान, शनिवार दि ३१ जुलै रोजी सायं. ५ वा. श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज व्यासपूजापूर्वक चातुर्मास व्रताचा स्वीकार करणार आहेत.            

 श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामींची शिस्त यापुढे उपयोगी पडेल. स्वामींनी जे कार्य केले तसेच कार्य करण्याचा आपण प्रयत्न करेन. ज्येष्ठाचे गुणगान केल्याने मन शुद्ध होते. आसनावर बसताना आनंद होत असतो. मात्र, ते आसन काटेरी असते, असे गुरू स्वामी सांगत होते. - श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी