दोघांचा मृत्यू, दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

सासष्टीतील जमीन घोटाळा प्रकरण : फातोर्डा पोलिसांकडून संशयितांना नोटिसा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th July 2021, 01:00 am
दोघांचा मृत्यू, दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

मडगाव : सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांनी फातोर्डा पोलिसांत, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री प्रकरणी नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यानंतर दोन संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून अन्य दोन संशयितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय एक संशयित पोलीस ठाण्यात हजर झाला. मात्र, सहाजण नोटीस प्राप्त झाल्यानंतरही चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मूळ मालकाला अंधारात ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे सासष्टीतही जमिनींच्या खरेदी-विक्रीचे प्रकार झाल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहेत. ज्या जमिनींच्या मूळ मालकांचा मृत्यू झालेला असेल किंवा जमीनमालक विदेशात स्थायिक झालेला असेल, जमिनीच्या देखभालीसाठी कोणीही नसेल, अशा जमिनी हडप करण्याचे किंवा त्यांची विक्री करण्याचे प्रकार घडलेले आहेत. यासंदर्भात सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांनी १५ जून २०२१ रोजी फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
१३ जमिनींच्या विक्रीचा व्यवहार हा बनावट कागदपत्रांद्वारे झाला असून, मामलेदार कार्यालयातील केवळ त्याच व्यवहाराच्या फाईल्स गहाळ झालेल्या आहेत, असे या तक्रारीत गावकर यांनी नमूद केले आहे. जमिनींचे व्यवहार बनावट कागदपत्राद्वारे झाल्याचे लक्षात आल्यानंतर सासष्टीतील उपनिबंधक कार्यालयाला ३० ऑक्टोबर २०२० व १३ नोव्हेंबर २०२० रोजी पत्र लिहून संबंधित जमिनींची माहिती मागवण्यात आली होती. १० नोव्हेंबर २०२० व ७ डिसेंबर २०२० रोजी मडगाव उपनिबंधक कार्यालयाकडून जमिनी व्यवहाराबाबतच्या कागदपत्रांच्या प्रती पाठवण्यात आल्या होत्या. या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर उपनिबंधक कार्यालयातील व त्या जमिनींच्या झालेल्या व्यवहारातील कागदपत्रांचा कोणताही मेळ बसत नव्हता. यानंतर काही म्युटेशन रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मात्र, मामलेदार कार्यालयातील रेकॉर्ड रूममधून संबंधित घोटाळा झालेल्या फाईल्स गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जमीन विक्रीसाठी बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या अर्जदारांविरोधात मामलेदार गावकर यांनी तक्रार नोंदवली.
केवळ एकच संशयित चौकशीसाठी हजर
बनावट कागदपत्रांद्वारे जमिनींची खरेदी विक्री केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी १७ संशयितांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर संशयितांपैकी फ्रान्सिस्को कुलासो, रेजिनो फालेरो यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आलेक्स फालेरो व जॉन फालेरो यांचा मृत्यू झालेला आहे. महादेव चव्हाण यांनी पोलिसांसमोर हजेरी लावली. पण रुबी फर्नांडिस, पावलिनो फालेरो, अॅना मारिओ फालेरो, सॅबेस्त्याव परेरा, मारिओ जुवांव फालेरो, अँजेलो मोंतेरो हे संशयित नोटीस प्राप्त झाल्यानंतरही उपस्थित राहिले नाहीत.
फातोर्डा पोलिसांकडून गुन्हा नोंद
बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, फसवणुकीच्या एका समान हेतूने अनेकांनी कार्य करणे यासाठी फातोर्डा पोलिसांकडून कलम ४६५, ४६८, ४७१, ४२० यांसह भा.दं.सं. ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याप्रकरणी फ्रान्सिस्को कुलासो (दवर्ली), रुबी फर्नांडिस (दवर्ली), आलेक्स फालेरो, जॉन फालेरो, रिजेनो फालेरो, पावलिनो फालेरो, मारिओ फालेरो, अँजेला मोंतेरो फालेरो, डायगो फर्नांडिस, पिएदाद डिसोझा (सर्व सां जुझे द अरियाल), अॅना मारिओ परेरा, सॅबेस्त्याव परेरा (दोघे रा. बोर्डा, मडगाव), मार्टिस कुतिन्हो (कुंकळ्ळी), जुवांव आलेक्स रोझारिओ लुईस (कोलवा), वालेरियन थॉमस (कोलवा), अॅना वाझ (कोलवा), महादेव चव्हाण (डोंगरी नावेली) या संशयितांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत.
मामलेदार कार्यालयातून फाईल्स गायब
सासष्टी तालुक्यातील जमिनींच्या विक्रीचे व्यवहार बनावट कागदपत्रांचा वापर करून झालेला आहे. याबाबतची माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांसमोरील सुनावणीत उघडकीस आली. त्यानंतर मामलेदार कार्यालयातील रेकॉर्ड रुममधील संबंधित जमीन व्यवहारांच्या म्युटेशनसंदर्भातील १३ फाईल्स गायब झाल्या. या फाईल्स वेगवेगळ्या मामलेदारांच्या कालावधीतील आहेत. त्यामुळे या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मामलेदारांनी तक्रार नोंदवली व पोलिसांनी मामलेदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती घेतलेली आहे.
मामलेदार प्रतापराव गावकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीचे व्यवहार झाल्याच्या केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद केलेला आहे. संशयितांना नोटीस पाठवण्यात आलेली असून सर्व बाजूंनी या जमीन व्यवहारांबाबतचा तपास केला जात आहे. - कपिल नायक, पोलीस निरीक्षक, फातोर्डा

हेही वाचा