Goan Varta News Ad

करोना चाचणी प्रमाणपत्र सक्ती हवीच

मायकल लोबो : पर्यटन हंगाम सुरू करताना सतर्कता गरजेची

|
22nd June 2021, 10:45 Hrs
करोना चाचणी प्रमाणपत्र सक्ती हवीच

पर्रा येथे शेतकर्‍यांना झळझाडे वितरित करताना मंत्री मायकल लोबो. सोबत सरपंच डिलायला लोबो व इतर.   


प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : करोनाच्या पार्श्वभूमीवर ठप्प असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू केल्यानंतर गोव्यात प्रवेश करताना करोना लसचे दोन्ही डोस किंवा आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र यापुढेही सक्तीचे असायला हवे, असे मत मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले.
पर्रा येथे शेतकर्‍यांना फळझाडे व खत वितरणानंतर मंत्री लोबो पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सरपंच डिलायला लोबो व पंचायत सदस्य उपस्थित होते. सध्या महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने निर्बंध शिथील केले आहेत. यामुळे पर्यटकांची रेलचेल गोव्याकडे सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोबो यांनी वरील मतप्रदर्शन केले.
बस, विमान किंवा रेल्वे मार्गे गोव्यात प्रवास करणार्‍यांना करोना लसचे दोन्ही डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य असायलाच हवे. याविषयी आपण मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव मांडून तो मं‌त्रिमंडळात मांडण्याची विनंती करणार आहोत, असे लोबो म्हणाले.
भविष्यात पर्यटन व्यवसाय खुला करावा लागेल. यासाठी ही सूचना आपण मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे. अजून करोनाचा संसर्ग आहे. लोकांचा मृत्यू होत आहे. यास्थितीत सरकारने सर्वांशी विचारविनिमय करूनच हा निर्णय घेणे आवश्यक आहे. पर्यटनावर अनेकांचा उदारनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे हा व्यवसाय भविष्यात सुरू करावाच लागेल. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये जेव्हा पर्यटन सुरू होईल. त्यावेळी गोव्यात प्रवेश करणार्‍यांना वरील प्रमाणपत्र बंधनकारक करणे उच्चित ठरेल. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काळजी घेऊन सर्व पर्यटन भागधारक आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून याबाबतीत निर्णय सरकारला घ्यावा लागेल, असे लोबो म्हणाले.

रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी केली जात नसल्यास आपण संबंधितातर्फे चौकशी करेन. असा प्रकार आढळल्यास मुख्यमंत्र्यांसह संबंधितांकडे यावर कार्यवाही करण्याची मागणी केली जाईल. _ मायकल लोबो, बंदर विकास मंत्री

साळगाव कचरा प्रकल्पात तयार होणार्‍या खताची प्रत्येकी एक पिशवी आणि फळझाडे गावातील शेतकर्‍यांना विनाशुल्क वितरित करण्यात आली आहे. अशाप्रकारेच शेतकर्‍यांना लागणार्‍या गरजांची पंचायतीतर्फे पूर्तता केली जाईल. _ डिलायला लोबो, सरपंच