युवकांनी शेती व्यवसायाकडे वळावे : सुभाष शिरोडकर


22nd June 2021, 10:13 pm
युवकांनी शेती व्यवसायाकडे वळावे : सुभाष शिरोडकर

शेती यंत्राचे अनावरण करताना आमदार सुभाष शिरोडकर. सोबत इतर मान्यवर.       


प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : आपला देश हा कृषिप्रधान देश असून कृषी क्षेत्रातील गतवैभव परत मिळवण्यासाठी युवकांनी शेती व्यवसायाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. आपल्या मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतजमिनीचा शेतीसाठी वापर व्हावा हेच आपले उद्दिष्ट आहे. तसेच स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत, असे प्रतिपादन शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी शिरोडा येथे केले.
येथील महामाया सभागृहात शेतकी व्यवसाय वाढवणे तसेच स्वयंसहाय्य गट सबलीकरण या कार्यक्रमांतर्गत शिरोडा पंचायतीने शेतकऱ्यासाठी खरेदी केलेल्या गवत कापणी यंत्र, पॉवर ट्रीलर आणि ट्रॅक्टरच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर त्यांच्या सोबत शिरोडाचे सरपंच अमित शिरोडकर, उपसरपंच साल्वासाव फर्नांडिस, श्री कामाक्षी संस्थानचे अध्यक्ष उमेश कामत बुडकुले, फोंड्याचे गटविकास अधिकारी अश्विन देसाई, शिरोड्याचे जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, भाजप‍ मंडळ शिरोड्याचे अध्यक्ष सूरज नाईक, शिरोडाचे पंच सदस्य, शिरोडा अर्बनचे अध्यक्ष शिवानंद नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वयंसहाय्य गटातील महिलांना शिवण यंत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास स्वयंसहाय्य गटातील महिला तसेच शिरोडा पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.