मडगावात लॉकडाऊन उठवताच पुन्हा गर्दी

खरेदीसाठी नागरिक मार्केटमध्ये : बसस्थानकावरही प्रवाशांत वाढ


04th May 2021, 12:49 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला मडगाव व परिसरातील लोकांनी मागील तीन दिवस चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. मात्र, लॉकडाऊन उठवून निर्बंध जारी केल्यानंतर सोमवारपासून बाजारात, रस्त्यांवर, बसस्थानक व मासळी मार्केट आदी ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आले.
मडगावसह संपूर्ण सासष्टी परिसरातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनला प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केले होते. मागील तीन दिवस मडगावातील गांधी मार्केट, न्यू मार्केट, एसजीपीडीएचे घाऊक मच्छीमार्केटही बंद ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त कोणतेही दुकान सुरू राहिले नसल्याने लोकही घरातच राहिले होते. पालिका निवडणुकांमुळे मडगाव परिसरातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झालेली होती. आता ही संख्या कमी करण्यासाठी व करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विरोधी आमदारांसह मार्केटमधील व्यापारी असोसिएशन व सर्वसामान्यांकडून कडक लॉकडाऊनची मागणी केली जात होती.
मागील तीन दिवसांत पोलिस रस्त्यावर नव्हते. पण, तरीही लोकांनी शिस्त व नियम पाळली होती. मुख्यमंत्र्यांनी सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर न करता केवळ निर्बंध असल्याचे जाहीर केले. यात रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची, दुकाने सकाळी ७ ते सायं. ७ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सोमवारी मार्केटमधील अनेक दुकाने खुली करण्यात आली. ग्राहकांनीही खरेदीसाठी गर्दी केल्याचे दृश्य दिसून आले. कदंब स्थानकावरही तीन दिवसांनंतर पुन्हा प्रवासीवर्ग दिसून आला. अजूनही परप्रांतीय कामगार आपापल्या गावी जाण्यासाठी मडगाव रेल्वेस्थानकावर बसून होते. तीन दिवस घरात राहिलेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणांवर येण्यास सुरुवात केलेली असल्याने सासष्टी परिसरातील करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.