Goan Varta News Ad

म्हादई : राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेचे पथक गोव्यात

खारटपणा तपासणीसाठी आज नमुने घेणार

|
24th February 2021, 12:12 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : म्हादई नदीतील पाण्याच्या खारटपणाची चाचणी करण्यासाठी राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेचे पथक मंगळवारी गोव्यात दाखल झाले. बुधवारी कणकुंबी ते पणजीपर्यंतच्या म्हादई नदीतील पाण्याचे नमुने हे पथक गोळा करणार आहे. राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेचे पथक कणकुंबी ते पणजीपर्यंतच्या म्हादई नदीतील चौदा ठिकाणांवरून पाण्याचे नमुने चाचणीसाठी गोळा करणार आहे. त्यानंतर गुरुवारी पथक दिल्लीला परतणार असल्याची माहिती मिळाली आहे.
म्हादईप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असतानाही कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी मलप्रभेत वळविण्याचा घाट सुरूच ठेवला. त्यामुळे राज्य सरकारने ऑक्टोबर २०२० मध्ये म्हादईप्रश्नी कर्नाटकविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर म्हादई नदीचा खारटपणा तपासल्याशिवाय पिण्यायोग्य किती पाणी आहे याचा अंदाज येणार नाही, हे लक्षात घेऊन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडे म्हादई नदीतील पाण्याचा खारटपणा तपासण्याचीही मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार केंद्राने राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेमार्फत म्हादईचा खारटपणा तपासण्याचा निर्णय घेऊन संस्थेच्या पथकाला गोव्याला पाठवले होते. त्यावेळी संस्थेने म्हादईच्या पाण्याचे नमुने घेतले होते. पण त्यानंतर म्हादईतील पाण्याची हिवाळ्यात चाचणी करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी शेखावत यांच्याकडे केली होती. त्यानुसार पथक बुधवारी म्हादईतील पाण्याचे नमुने घेणार आहे. दरम्यान, म्हादईप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात गाजत आहे. डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधी पक्ष हाच मुद्दा पुढे करत त्यांच्यावर टीका करत आहेत. पण, मुख्यमंत्रीही त्यांच्या टीकेला विधानसभा सभागृह आणि बाहेरही सडेतोड उत्तर देत आहेत.
दरम्यान, म्हादई अवमान याचिकेवरील सुनावणी दरम्यान तिन्ही राज्यांनी संयुक्त पथक नेमून कळसा-भांडुरा प्रकल्पाची पाहणी करावी आणि चार आठवड्यांत अहवाल सादर करावा, असे निर्देश सोमवारीच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर लगेचच खारटपणा तपासण्यासाठी केंद्राचे पथकही दाखल झाले आहे. त्यामुळे गोव्याला आणखी दिलासा मिळाला आहे.