Goan Varta News Ad

लोकसंस्कृतीचे संशोधक, साहित्यिक विनायक खेडेकर यांना ‘पद्मश्री’

७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण, १०२ जणांना पद्मश्री

|
26th January 2021, 12:04 Hrs
लोकसंस्कृतीचे संशोधक, साहित्यिक विनायक खेडेकर यांना ‘पद्मश्री’

फोटो : विनायक खेडेकर
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी/नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ७ जणांना पद्मविभूषण, १० जणांना पद्मभूषण, तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत. गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक व साहित्यिक विनायक विष्णू खेडेकर यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्यासह मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतरत्ननंतर पद्म पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात. राजकारण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना केंद्र सरकारतर्फे गौरविण्यात येते.
गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषण (मरणोत्तर), माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण, तर लोजपचे नेते रामविलास पासवान यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर झाला आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील ५९ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’, देशातील ५२ तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सुधारात्मक सेवा पदक’ तसेच पोलिस पदकांचीही घोषणा झाली आहे.
पद्मविभूषणचे मानकरी
शिंजो आबे, जपानचे माजी पंतप्रधान
एस. पी. बालसुब्रह्मण्यम, गायक (मरणोत्तर)
डॉ. बेल्ले हेगडे, वैद्यकीय
नरिंदर सिंह कपनी, विज्ञान आणि अभियांत्रिकी (मरणोत्तर)
मौलाना वहिदुद्दीन खान, आध्यात्मिक
बी. बी. लाल, पुरातत्वशास्त्र
सुदर्शन शाहू, कला
__
बॉक्स
विनायक खेडेकर यांचा परिचय
८२ वर्षीय विनायक खेडेकर यांनी साहित्य व संशोधन क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेतले नसले तरी गुरुकुल पद्धतीने संस्कृत आणि वैदिक शिक्षण घेतले आहे. मराठी, कोकणी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत आणि पोर्तुगीज भाषांचे त्यांना ज्ञान आहे. गोव्याच्या कानाकोपऱ्यांत जाऊन त्यांनी लोककला व लोकसंस्कृतीचा अभ्यास केला. गोवा आणि बाहेरील राज्यांतील दैनिकांत त्यांनी स्तंभलेखन केले आहे. कला अकादमीत बरीच वर्षे त्यांनी सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. भारत सरकारचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून त्यांनी रशिया, अमेरिका यांसह आशियाई देशांचे दौरे केले आहेत. गोवा सरकारचा सांस्कृतिक पुरस्कार, महाकवी कालिदास पुरस्कार, रंग सन्मान पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले असून आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठीही त्यांनी कार्यक्रम केले आहेत. पुरस्कार घोषित झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणतात, लोकसंस्कृतीसाठी दिलेल्या योगदानाची सरकारने दखल घेतली, त्याबद्दल मला आनंद झाला. लोकसंस्कृतीच्या क्षेत्रात खूप कार्य करायचे आहे. पुरस्काराने जबाबदारी वाढवली आहे. गोव्याची संस्कृती जागतिक नकाशावर पोहोचली पाहिजे यासाठी काम करणार आहे.