रस्तामार्गे महाराष्ट्रात जाण्यास प्रमाणपत्र अनिवार्य नाही!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th November 2020, 11:48 pm
रस्तामार्गे महाराष्ट्रात जाण्यास प्रमाणपत्र अनिवार्य नाही!

पणजी : गोव्यासह दिल्ली, राजस्थान आणि गुजरात या चार राज्यांतून विमान आणि रेल्वे मार्गे महाराष्ट्रात जाणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य आहे. रस्तामार्गे जाणाऱ्यांना प्रमाणपत्र सक्तीचे नाही. रस्तामार्गे जाणाऱ्यांचे महाराष्ट्राच्या सीमेवर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.
रस्तामार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्यांचे सीमेवर थर्मल स्क्रिनिंग केले जाईल. ज्यांच्यात करोनाची लक्षणे दिसणार नाहीत त्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येईल. ज्यांच्यात लक्षणे दिसतील अशांना अँटीजन चाचणी करून घ्यावी लागेल. त्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यास महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येईल. अहवाल बाधित असल्याचा आल्यास कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल. चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर संबंधित व्यक्तीला राज्यात प्रवेश देण्यात येईल, असे महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, विमान आणि रेल्वे मार्गे महाराष्ट्रात जाणाऱ्यांना अनुक्रमे ७२ आणि ९६ तासांतील आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करावे लागेल. प्रमाणपत्र नसल्यास थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. तेथे लक्षणे न दिसल्यास घरी सोडण्यात येईल. लक्षणे दिसल्यास तेथे स्वखर्चाने चाचणी करून घ्यावी लागेल. या चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्यास घरी सोडण्यात येईल. बाधित असल्यास कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.


चाचणीसाठी गोमेकॉत गर्दी
महाराष्ट्राने जारी केलेल्या नियमावलीचा गोव्यात मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवला. कोविड चाचणीसाठी मंगळवारी सकाळपासूनच बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या. महाराष्ट्रात जाऊ इच्छिणारे तसेच पर्यटकांनी गोमेकॉमध्ये करोना चाचणी प्रमाणपत्रासाठी गर्दी केल्याने इस्पितळाच्या बाह्य रुग्ण विभागातून चाचणीसाठी पाठविण्यात येणारे रुग्ण खोळंबून राहिल्याचे दिसून आले.      

हेही वाचा