दवर्लीतील रेल्वेचे काम आमदार फालेरोंनी पाडले बंद

रेल्वे पोलिसांशी चर्चा : जमीन संपादनाची कागदपत्रे दाखवा तोपर्यंत काम थांबवा


23rd November 2020, 11:21 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : कोळसाविरोधात आंदोलनातील नागरिकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर सोमवारी दवर्लीतील नागरिकांनीही आक्रमक भूमिका घेतली. पंचायत हॉलमध्ये चर्चेसाठी आलेल्या आमदार लुइझिन फालेरो यांना आधी रेल्वेचे काम थांबवण्यास सांगत थेट रेल्वे फाटकानजीकचे सुरू असलेले काम बंद करण्यास सांगितले. आमदार फालेरोंनीही लोकांसोबत असल्याचे दाखवत रेल्वे पोलिसांशी चर्चा करत जमीन संपादनाची कागदपत्रे दाखवा व तोपर्यंत काम थांबवण्यास सांगितले.

नेसाय येथे सकाळी नागरिकांनी मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांना घेराव घालत नागरिकांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर दवर्ली येथील नागरिकांनीही पंचायत हॉलमध्ये जमत नावेलीचे आमदार लुइझिन फालेरो यांना रेल्वे दुपदरीकरणावरील भूमिका स्पष्ट करण्यासाठी चर्चेसाठी बोलावले. आमदारांनी ‘काही वेळात येतो’ असे सांगितल्यानंतर हॉलमधील गर्दी वाढत गेली. आमदार फालेरो सभागृहात दाखल झाल्यानंतर त्यांनी रेल्वे दुपदरीकरणाविरोधात तीन वर्षांपासून भूमिका घेतली असून विधानसभेतही आवाज उठवला असल्याची माहिती दिली. जमिनीचे पैसे घेऊन लोकांनी जमिनी दिल्याने रेल्वेने यावर्षीपासून काम सुरू केल्याचे म्हणताच लोकांनी आक्षेप घेत किती जणांनी पैसे घेतल्याचे दाखवून देण्यास सांगितले. आपण लोकांसोबत असाल तर रेल्वेचे काम थांबवण्यासाठी आमच्यासोबत चला, असे सांगत त्यांना दवर्ली येथील रेल्वे दुपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी येण्यास भाग पाडले. आमदार फालेरो यांनीही लोकांसोबत असल्याचे सांगत रेल्वेचे काम सुरू असलेल्या दवर्ली येथील फाटकानजीकच्या ठिकाणी लोकांसोबत चालत गेले. तेथे रेल्वेचा अधिकारी उपस्थित नसल्याने आमदार फालेरोंनी उपस्थित रेल्वे पोलिसांशीच चर्चा करत काम थांबवण्यास सांगितले. जमिनीची सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतरच काम सुरू केल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. यावर जमीन संपादन व इतर परवानगी नाही, असे म्हणणे लोकांचे असल्याने मंगळवारी कागदपत्रांसह रेल्वे अधिकार्‍यांना उपस्थित राहण्यास सांगा. तोपर्यंत काम बंद ठेवा, अशा सूचना केल्या. रेल्वे काम करत असलेली जमीन ही संपादित करण्यात आलेली नाही, जमिनीचा मोबदला कुणीही घेतला नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. मग रेल्वे कशी काम पुढे नेत असल्याची विचारणा करत नागरिक आंदोलन करत आहेत. त्यामुळे कागदपत्रे दाखवल्यानंतरच काम सुरू करावे, असे आमदार फालेरो यांनी सांगितले. राज्याबाहेरील पोलिसांना परत पाठवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. दवर्ली येथील रेल्वे दुपदरीकरणाचे काम रोखल्यानंतर आमदार फालेरो व नागरिकांनी घटनास्थळ सोडले.

हेही वाचा