लक्षणे नसलेल्या करोनाबाधितांचा मृत्यू

दोन दिवसांत हॉस्पिसिओत दोघांचे निधन


23rd November 2020, 12:01 am
लक्षणे नसलेल्या करोनाबाधितांचा मृत्यू

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : नवे रुग्ण मिळण्यासह रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असले तरी लक्षणे नसलेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवार आणि शनिवारी लक्षणे नसलेल्या दोघांचा मडगावच्या हॉस्पिसिओ रुग्णालायात मृत्यू झाला. लक्षणे नसल्यामुळे एकाची चाचणी केलेली नव्हती. मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

अलीकडे करोना रुग्णांची संख्या बरीच कमी झाले आहे. एकाही आरोग्य केंद्रात १०० हून अधिक रुग्ण नाहीत. नवे बाधित मिळण्याच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने सक्रिय बाधितांचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे लोकांमधील भीती कमी झाली आहे. चाचण्यांची संख्याही कमी झाली आहे. लक्षणे नसलेले रुग्ण होम आयसोलेशनात असतात. त्यांपैकीच दोघांचा मृत्यू झाल्याने ही गंभीर गोष्ट ठरते.

दोघांपैकी एकाला मृत्यूनंतर रुग्णालयात आणले होते. करोनाची लक्षणे नव्हती, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. यापूर्वी शुक्रवारीही एकाला मृत्यूनंतर रुग्णालयात आणले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला कोणतीच लक्षणे नव्हती. दोन दिवसांत लक्षणे नसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. रविवारी नावेली (८७ महिला) आणि कुडतरी (७८) येथील बाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील मृतांचा एकूण आकडा ६७७ झाला आहे.


हेही वाचा