Goan Varta News Ad

वास्कोत महिला काँग्रेसकडून स्वस्त दरात कांद्याची विक्री

गोवा सरकारने गरिबांना फसवू नये : प्रतिमा कुतिन्हो

|
22nd November 2020, 12:51 Hrs

फोटो : वास्को जुन्या बसस्थानकावर कांदा विक्री करताना प्रतिमा कुतिन्हो व इतर. (अक्षंदा राणे)

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वास्को : गृहआधार योजनेखाली गोवा सरकार महिलांना दोन हजार रुपये देते तर दुसर्‍या हाताने पंधरा हजार काढून घेते, असा आरोप गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. गोवा सरकारने गरिबांना फसवू नये, असे आवाहन त्यांनी येथे शनिवारी दुपारी केले.

गोवा प्रदेश महिला काँग्रेसतर्फे येथील जुन्या बस स्थानकावर २५ रुपये किलो या दराने ५५ किलो कांदा विकण्यात आला. कमी किमतीत मिळणारा कांदा खरेदी करण्यासाठी सुरक्षित अंतराकडे दुर्लक्ष करून ग्राहकांनी गर्दी केली. अनेक जणांना मोकळ्या हाताने परतावे लागले. यावेळी प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह मुरगावच्या माजी उपनगराध्यक्ष शांती मांद्रेकर, स्नेहा फोंडेकर, प्रतिमा बांदेकर, अमिना शेख, लालन पार्सेकर आदी उपस्थित होते.

आम्ही पणजी, मडगाव, शिवोली, फोंडा, केपे, कुडचडे आदी ठिकाणी कांदा विकला. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वास्कोमध्ये आम्ही पुन्हा कांदा विक्रीसाठी येणार आहोत, असे कुतिन्हो यांनी सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री, नागरी पुरवठामंत्री, गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष यांना लक्ष्य केले. प्रत्येक रेशनकार्डावर तीन किलो कांदा देऊ, असे सांगणार्‍यांनी आतापर्यंत फक्त एकच किलो कांदा दिला आहे. कांदा कुजका असल्याने तो घेण्यास रेशन दुकानदार तयार नाहीत, असे त्यांनी सांगितले.