कंत्राटी कामगारांचा पगार द्या !

आमदार सुदिन ढवळीकर यांची मागणी


22nd November 2020, 12:49 am
कंत्राटी कामगारांचा पगार द्या !

फोटो : सुदिन ढवळीकर

प्रतिनिधी । गोवन वार्ता

फोंडा : येत्या काही दिवसांत राज्यात दहा हजार नोकर्‍या देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र तत्पूर्वी सरकारने कंत्राटी पद्धतीवर कामाला असलेल्या कामगारांचा पगार द्यावा आणि गेली दहा-बारा वर्षे विविध खात्यांत कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कामगारांना सेवेत कायम करावे, असे आवाहन मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

ढवळीकर पुढे म्हणाले, सरकारकडून कंत्राटदारांची बिले थकवण्यात आली आहेत. कंत्राटदारांची बिले वेळेत फेडली गेली नाहीत, तर त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या कामगारांना पगार मिळत नाही. त्यासाठी सरकारने सदर बिले वेळेत फेडण्याची गरज आहे. म्हादईचा तिढा सुटलेला नाही. सध्या म्हादईचे पाणी आटू लागले असून भविष्यात मोठे संकट उभे रहाणार आहे. याला भाजप आणि त्यापूर्वीचे काँग्रेस सरकार जबाबदार आहे. राज्यात, कर्नाटकात आणि केंद्रात भाजपचे सरकार असूनही म्हादई संदर्भात ठोस निर्णय होत नाही. याचाच अर्थ कर्नाटक सरकारने पद्धतशीर चाल रचली आहे, असा आरोपही ढवळीकर यांनी केला.

मगो पक्षाने १७ वर्षांच्या राजवटीत गोव्याच्या हिताचेच निर्णय घेतले. काँग्रेस आणि भाजप सरकारच्या काळात गोव्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न होत आहे. या सार्‍या बाबींचा विचार करून गोमंतकीयांनी पुन्हा एकदा मगो पक्षाला पाठिंबा देऊन गोमंत भूमी सुजलाम् सुफलाम् करावी.

- सुदिन ढवळीकर, आमदार, मगो