सहकारी सोसायट्यांनी विश्वासार्हता जपावी

- मंत्री गोविंद गावडे : फोंडा येथे कर्मचार्‍यांसाठी ‘ओटीएस’ माहिती कार्यशाळा

Story: पणजी : |
31st October 2020, 12:26 am
सहकारी सोसायट्यांनी विश्वासार्हता जपावी

पणजी : सहकारी सोसायट्यांनी खातेदारांचा विश्वास जपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी संचालक मंडळ तसेच कर्मचार्‍यांची जबाबदारी मोठी आहे. कष्ट करून कमावलेला पैसा अनेकजण मोठ्या विश्वासाने सहकारी सोसायट्यांत ठेवतात. त्यांच्या धारणांना तडा जाता नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी केले.    

  द गोवा स्टेट को ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या वतीने सहकार निबंधक कार्यालयाच्या सहकार्याने कुर्टी-फोंडा येथील सहकार भवनात नव्या ओटीएस योजनेबाबत माहिती देण्यासाठी नुकतेच एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा राज्यभरातील ग्रामीण सहकारी सोसायट्या तसेच विकास सोसायट्यांतील ११५ प्रतिनिधींनी लाभ घेतला. 

 यावेळी मंत्री गोविंद गावडे बोलत होते. त्यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी मंत्री गावडे यांनी गोवा राज्यने ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल खास अभिनंदन केले. तसेच त्यांच्या जागेविषयी मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.  गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय प्रभू यांनी मान्यवरांचे स्वागत करत या कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश विषद केला. 

यावेळी सहकार निबंधक बिजू नाईक मार्गदर्शन करताना म्हणाले, वन टाईम सेटलमेंट योजनेची अंमलबजावणी करावी लागणे ही बाब काही सहकारी सोसायट्यांसाठी पोषक नाही. कर्जे देताना परिपूर्ण अभ्यास करूनच ती निकषांत द्यावीत. तसेच ती वसुल करतानाही तत्परता दाखवणे गरजेचे आहे. त्यानंतर सहकार अधिकारी मंगेश फडते, राजू मगदूम यांनी पॉवर पॉइंटच्या माध्यमातून ओटीएस प्रक्रियेबाबत विस्ताराने विवेचन केले. उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचेही निरसन केले. गोवा राज्यचे  संचालक ऑगस्टो डिकॉस्टा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष बिसो गावस यांनी आभार मानले.

मंत्री गावडे यांचे सल्ले 

* ग्रामीण भागातील नागरिकांना सहकारी सोसायट्या जवळच्या वाटतात. हा विश्वास जपला पाहिजे. 

* कर्ज देताना संबंधित व्यक्ती त्या योग्यतेची आहे का, याबाबतचे जे निकष आहेत, त्याची योग्य तडताळणी होणे आवश्यक आहे. 

* तसेच कर्ज दिल्यानंतर त्यांच्या वसुलीबाबत अत्यंत दक्षता घेणेही महत्वाचे आहे. जेणेकरून थकित कर्ज वाढणार नाहीत व सोसायटी नुकसानीत जाणार नाही. 

* ‘ओटीएस’ची वेळ येऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.