आत्मनिर्भरतेच्या मळ्यात बहरले झेंडू

धारबांदोड्यातील महिला स्वयंसाहाय्य गटांची आदर्शवत वाटचाल

Story: गणेश जावडेकर । गोवन वार्ता |
31st October 2020, 12:17 am

पणजी : दूध तसेच भाजीपाला उत्पादनात राज्य स्वयंपूर्ण बनावे, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असतानाच धारबांदोड्यातील महिला स्वयंसाहाय्य गटांनी आत्मनिर्भर बनत झेंडूच्या फुलांची लागवड करून, स्वयंपूर्णतेकडे वाटचाल कशी करावी, याचा आदर्शच घालून दिला आहे. राज्यात झेंडू फुलांच्या शेतीला मोठा वाव आहे. नारळ, काजू, सुपारी यांप्रमाणे झेंडूच्या फुलांमुळे सुद्धा चांगले उत्पन्न मिळू शकते, हे या स्वयंसाहाय्य गटांनी दाखवून दिले आहे. 

गोव्यात फुलांना मोठी मागणी असली तरी फुलांची शेती मोठ्या प्रमाणात बहरलेली दिसत नाही. घरासमोरच्या बागेत तसेच बागायतीत सर्वजण फुलझाडे लावत असले, तरी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत म्हणून या झाडांकडे बघितले जात नाही. पारंपरिक फुलविक्रेते फुले विकत घेतात आणि माळा करून विकतात. दसरा, गुढीपाडवा तसेच दिवाळीला गरज भागविण्यासाठी परराज्यातून मोठ्या प्रमाणात फुले आणली जातात.
राज्यातील फुलांची मागणी लक्षात घेऊन यंदा धारबांदोड्यातील स्वयंसाहाय्य गटाच्या महिलांनी कृषी खात्याच्या मदतीने झेंडुच्या फुलांचे बगीचे फुलवून भरीव कमाई केली. यंदाच्या दसऱ्याला धारबांदोड्यातील स्वयंसाहाय्य गटांनी ६ ते ७ हजार किलो फुलांची विक्री केली. सरासरी ८० ते १०० रुपये किलो दराने ही फुले विकली गेली. याशिवाय आता दिवाळीलाही पुन्हा फुले मिळणार असल्याची माहिती धारबांदोडा कृषी खात्याचे अधिकारी नागेश कोमरपंत यांनी दिली.
धारबांदोडा तालुक्यातील १२ स्वयंसाहाय्य गटांना ‘आत्मा’ या कृषी खात्याच्या योजनेखाली प्रत्येकी १ हजार रोपे देण्यात आली होती. याशिवाय या गटांना लागवड कशी करावी, तसेच निगा कशी घ्यावी, याची माहिती दिली होती, असे कोमरपंत यांनी सांगितले. इतर तालुक्यातही झेंडूची लागवड करण्यात आलेली आहे. तरीही धारबांदोड्यात जशी रोपे बहरली तशी अन्य तालुक्यात बहरली नाहीत, असे ते म्हणाले.
स्वयंसाहाय्य गटातील बऱ्याच महिला पूर्वी पारंपरिक पद्धतीने रोपे लावायच्या. यंदा कृषी खात्याने सांगलीजवळील प्रवीराम नर्सरीतून रोपे आणून ती स्वयंसाहाय्य गटांना मोफत दिली आहेत. शेती, बागायतीप्रमाणेच फुलांच्या शेतीलाही राज्यात मोठा वाव आहे, हेच धारबांदोड्यातील स्वयं साहाय्य गटांनी दाखवून दिले आहे.

शेतकरी महिलांच्या प्रतिक्रिया
किर्लपाल येथील तुळशी गावकर (४९) ही महिला सती भगवती स्वयंसाहाय्य गटाची सदस्य आहे. तिने दीड हजार रोपटी लावली होती. प्रत्येक झाडाला किमान अर्धा किलो अशी फुले मिळाली. पूर्वी ६० ते ७० रुपये किलो दराने फुलांची विक्री झाली. दसऱ्याच्या दिवशी १०० रुपये किलो दराने विक्री झाली, असे तिने सांगितले. लीला गावकर या महिलेने १ हजार रोपे लावली आहेत. बरीच वर्षे आपण झेंडूची लागवड करते. यंदा पीक अधिक मिळाली, असे तिने सांगितले.

हेही वाचा