Goan Varta News Ad

कोळसा, दुपदरीकरणाला वाढता विरोध

नेसाय, चांदरमधील रेल्वेची कामे रद्द करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
31st October 2020, 12:13 Hrs
कोळसा, दुपदरीकरणाला वाढता विरोध

मडगाव : दक्षिणेतील लोकांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात रेल्वे दुपदरीकरणाचे काम सुरू ठेवणे राज्य सरकारसाठी जड जाण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी नेसाय येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ बांधकाम सुरू करण्यात आले होते. आता १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चांदर रेल्वे क्रॉसिंगजवळ काम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, या कामांचे आदेश त्वरित रद्द न केल्यास १ रोजी रात्री मोठ्या संख्येने लोक चांदरमध्ये जमतील. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असा इशारा कोळसा व दुपदरीकरणाला विरोध करणाऱ्या संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनी दिला आहे.

वास्को ते हॉस्पेट या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, सागरमाला प्रकल्प व राष्ट्रीय महामार्गाचे काम हे कोळसा वाहतुकीसाठी केले जात आहे, असा विरोधकांचा दावा आहे. जिंदाल, अदानी व वेदांता या कंपन्यांच्या फायद्यासाठी हे प्रकल्प असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. यातूनच दक्षिण गोव्यात दोन्ही प्रकल्पांना विरोध वाढला आहे. गोयचो एकवोट या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे कोळसा वाहतूक, रेल्वे दुपदरीकरण यांसह चांदर, दवर्लीतील कामांचे आदेश रद्दची मागणी केली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने कोळशाविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना काम बंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कोळसा वाहतूक व संबंधित प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.
दक्षिण गोव्यातील विविध भागांत गोयात कोळसो नाकातर्फे रॅली व सभा घेऊन जागृती करण्यात येत आहे. या संघटनेनेही दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांची भेट घेऊन रेल्वे प्रशासनाकडे पंचायत व इतर आवश्यक परवानगी नसल्याने चांदर व दवर्ली येथील कामासाठी दिलेले आदेश रद्द करण्याची मागणी केलेली आहे.

लोकप्रतिनिधींची मागणी...
- विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही जिल्हाधिकारी रॉय यांना पत्र लिहून रेल्वेच्या कामासाठी दिलेले आदेश जनभावनेचा आदर करून मागे घेण्याची सूचना केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून कोळशाविरोधातील जनप्रक्षोभ वाढत असल्याचे सांगितले आहे.
- दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी पत्रकार परिषद घेत रेल्वे दुपदरीकरणाचे काम पोलिस बंदोबस्तात करण्याचा प्रयत्न झाल्यास पंजाबप्रमाणेच राज्यातही रेल्वे रुळावर झोपून आंदोलन होईल. लोकांचे म्हणणे राज्य सरकारने ऐकून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
- गोयात कोळसो नाकाचे सहसंयोजक अभिजीत प्रभुदेसाई यांनी जिल्हाधिकारी रॉय यांची भेट घेत, आदेश मागे घेण्याचे निवेदन सादर केले आहे. तसेच आदेश मागे न घेतल्यास १ नोव्हेंबरला रात्री जनताच सरकारला त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा दिला आहे.
- राज्य सरकारला विविध मुद्यांवर पाठिंबा देणाऱ्या आमदार चर्चिल आलेमाव यांनीही कोळशाविरोधातील आंदोलनात आपण जनतेसोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे. लोकांना नको असलेले प्रकल्प राज्य सरकारने पुढे नेऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नेसाय रेल्वे गेटजवळील काम बंद
नेसाय येथील रेल्वे गेटजवळ सुरू केलेल्या कामांसाठी सां जुझे द अरियाल पंचायतीची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे काम तत्काळ थांबवण्याची नोटीस रेल्वे विकास निगम लि.च्या प्रकल्प अधिकाऱ्यांना जारी करण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी हे काम बंद करण्यात आले.

ग्रामस्थांनीही घेतला होता आक्षेप
नेसायमधील रेल्वे गेटजवळ उभारण्यात येत असलेली रूमची जागा रेल्वेची नाही. त्यामुळे हे बांधकाम अवैध असल्याचा दावा करत नेसाय ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्याकडे परवानगी पत्र दाखवण्याची मागणी केली होती. त्याच्याकडे पंचायतीची परवानगी नसल्याने काम बंद करण्यास सांगण्यात आले.