Goan Varta News Ad

सिलिंडर, बँकांसाठी १ पासून नवे नियम

घरगुती गॅससाठी ओटीपी अनिवार्य ; पैसे भरण्यासाठी शुल्क

|
29th October 2020, 11:21 Hrs
सिलिंडर, बँकांसाठी १ पासून नवे नियम

नवी दिल्ली :  देशात १ नोव्हेंबरपासून सिलिंडर बुकिंग आणि बँकिंग व्यवहारासंदर्भात काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. तर दुसरीकडे रेल्वेद्वारेही वेळापत्रकात काही बदल करण्यात येणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम सामान्यांवर होणार आहे. 

१ नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडर तुमच्यापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया बदलणार आहे. सिलिंडर बुक केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येणार आहे. जेव्हा सिलिंडर घरी येईल तेव्हा सिलिंडर पोहोचवणाऱ्यांना तो ओटीपी द्यावा लागेल. सिस्टममध्ये त्या ओटीपीची पडताळणी केल्यानंतर ग्राहकांना सिलिंडर देण्यात येईल. नव्या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जसा फायदा होणार तसाच त्यांना समस्यांचा सामनाही करावा लागणार आहे. जर ग्राहकांचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक चुकीचा असला तर त्यांना सिलिंडर मिळणार नाही. त्यामुळे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अपडेट करण्याचे आवाहन कंपन्यांकडून करण्यात आले आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी हा नियम लागू असणार नाही.      

इंडेन गॅसने बदलला बुकिंग क्रमांक

जर तुम्ही इंडेन गॅस कंपनीचे ग्राहक असाल तर तुम्हाला जुन्या क्रमांकावर गॅस बुक करता येणार नाही. कंपनीने गॅसच्या बुकिंगसाठी आपल्या ग्राहकांना एक नवा क्रमांक जारी केला आहे. इंडेनच्या ग्राहकांसाठी आता देशभरात ७७१८९५५५५५ हा एकच क्रमांक असणार आहे.

बँकांमध्ये आता पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. बँक ऑफ बडोदाने याची सुरुवातही केली आहे. ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढल्यास यापुढे शुल्क द्यावे लागणार आहे. कर्ज खात्यासाठी जे ग्राहक तीनपेक्षा अधिक वेळा रक्कम काढतील त्यांना १५० रुपये शुल्क द्यावे लागेल. तर बचत खात्यांमध्ये केवळ तीन वेळा पैसे जमा करता येतील. परंतु चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना ४० रुपये मोजावे लागतील.

रेल्वेचे वेळापत्रक बदलणार
१ नोव्हेंबरपासून रेल्वेचे वेळापत्रकही बदलणार आहे. यापूर्वी १ ऑक्टोबरपासून वेळापत्रकात बदल होणार होता. परंतु काही कारणास्तव बदल १ नोव्हेंबरपासून केला जाणार आहे. देशात धावणाऱ्या १३ हजार प्रवासी रेल्वे आणि ७ हजार मालगाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. देशात धावणाऱ्या राजधानी गाड्यांच्याही वेळेत बदल होणार आहेत.