पेडण्यातील प्रकल्पांत स्थानिकांनाच प्राधान्य

मुख्यमंत्री डॉ. सावंत; नव्या अबकारी इमारतीचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th October 2020, 11:50 pm

पेडणे : या तालुक्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये तालुक्यातील युवकांनाच प्राधान्याने रोजगार दिले जातील. कोणावर अन्याय झाल्यास त्यांना आंदोलन करण्याची गरज नाही. चर्चा करून अन्याय दूर करू, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पेडण्यातील सरकारी कार्यालये भाडेपट्टीवरील इमारतींमध्ये आहेत. यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड पडत आहे. मात्र, पुढील दसऱ्याआधी ही कार्यालये सरकारच्या स्वत:च्या इमारतीत येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान, आमदार दयानंद सोपटे यांनी तुये येथील हॉस्पिटल इमारत पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
दसऱ्याचा मुहूर्त साधून पेडण्यातील नव्या अबकारी इमारतीचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, आमदार दयानंद सोपटे, नगराध्यक्ष स्वेता कांबळी, अबकारी आयुक्त हेमंत कुमार, व्यावसायिक कर अधिकारी शशांक त्रिपाठी, नगरसेवका उषा नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या इमारतीवर ३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

मोपा विमानतळ हा पेडणेकरांच्या विकासासाठी आणला आहे. जे विरोधक आवाज उठवतात त्यांनी येऊन आपल्याशी चर्चा करावी. या प्रकल्पात पेडणेकरांना रोजगार न मिळाल्यास मी स्वत: रस्त्यावर उतरेन. - मनोहर आजगावकर, उपमुख्यमंत्री.