Goan Varta News Ad

कळंगुटकर यांना फॉरवर्डचे तिकीट निश्चित

पक्ष प्रवेशानंतर आमदार सरदेसाई यांची घोषणा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th October 2020, 11:49 Hrs
कळंगुटकर यांना फॉरवर्डचे तिकीट निश्चित

पणजी : मांद्रेचे माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते दीपक कळंगुटकर यांनी कार्यकर्त्यांसही रविवारी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला आहे. आगामी काळात पक्षातर्फे त्यांना तिकीट देऊन निवडून आणून दाखवू, असा दावा पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
कळंगुटकर यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. रविवारी त्यांनी गोवा फॉरवर्डमध्ये रितसर प्रवेश केला. याप्रसंगी आमदार सरदेसाई यांच्यासोबत आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर, प्रशांंत नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरदेसाई यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीतील भाजप नेत्यांचे गुलाम बनले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांच्या तालावर मुख्यमंत्री नाचत आहेत. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक मिळत आहे. गोवा फॉरवर्डमध्ये त्यांचा सन्मान केला जाईल, असे आश्वासन सरदेसाई यांनी यावेळी दिले.

भाजपचे नेतृत्व सध्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहे. इतकेच नव्हे तर, मनाविरुद्ध बोलल्यास त्यांच्यावर सूड उगवत आहे. म्हणूनच २० वर्षे कार्य केल्यानंतर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. - दीपक कळंगुटकर

किरण कांदोळकर यांचा आज प्रवेश
थिवी मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर हे सोमवारी सायंकाळी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहळा अस्नोडा येथे होणार असून यानिमित्त जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी यावेळी दिली.