आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्यांचे ‘गीतारहस्य’

साहित्यसागर

Story: का. बा. मराठे ९४२३८८२२९० |
25th October 2020, 12:51 pm
आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्यांचे ‘गीतारहस्य’

दै. गोवन वार्ताच्या २६ जुलैच्या अंकात लोकमान्य टिळक यांच्या अजरामर ग्रंथाचा ‘श्रीमद्भगवद्गीता रहस्या’चा परिचय करून दिलेला वाचकांना स्मरतच असेल. त्यासंदर्भात सुमारे ७- ८ प्रतिक्रिया आल्या. बहुतेकांनी ग्रंथ विकत घेऊन वाचायची इच्छा प्रकट केली. या ग्रंथावर त्या काळात आलेली समीक्षा वाचण्याची माझी इच्छा होती. आजही आहे. काही मित्रांकडून २०१५ साली या ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी विशेषांक आले होते. दै. केसरीला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा या ग्रंथावर लेख आले होते, अशी माहिती मिळाली. श्री. म. माटे यांचा ‘गीतातत्व विमर्श’, वा. ल. मंजुळ यांचा ‘गीतेचा जगप्रवास’ यासारखे ग्रंथ बघायला हवेत. परंतु हे सर्व शक्य होईल आजची परिस्थिती सुधारल्यानंतर आणि पुण्याला जाऊन तेथील ग्रंथालये, पुस्तकांच्या दुकानाला भेट दिल्यावर.

गुगलगुरुवर यासंबंधी शोध घेत असताना अरुण तिवारी यांचा, मॉर्डन इंटरप्रेटेशन ऑफ लोकमान्य टिळकस गीतारहस्य, या पुस्तकाची माहिती मिळाली. फ्लिपकार्टवरून प्रत मागवली. त्याचा मराठी अनुवाद उपलब्ध असल्याचे नंतर कळले. पुण्याहून चुलतबंधू नागेश मराठे यांनी तो त्वरित पाठवून दिला. ही दोन्ही प्रकाशने, सकाळ प्रकाशनाची आहेत. इंग्रजीतील ग्रंथ डिसेंबर २०१७ मध्ये तर त्याचा मराठीत अनुवाद सुदर्शन आठवले यांनी एप्रिल २०१९ मध्ये केला आहे.

आपणासारख्या जागृत वाचकांना याचा परिचय करून द्यायला हवा. विशेषतः तरुणांनी हा ग्रंथ वाचायलाच हवा. ज्या तिवारी यांनी हा ग्रंथ लिहिला आहे, त्यांचा परिचय वाचकांना माजी राष्ट्रपती, वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांचे सहलेखक म्हणून माहीत असेल. कलाम यांचे सहकारी म्हणून त्यांना काम करायला मिळाले. ‘विंग्स ऑफ फायर आणि ‘ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिच्युअल एक्सपिरीयन्स विथ प्रमुख स्वामीजी’, यांचे सहलेखक तिवारी यांनी स्वतंत्रपणेही कलाम यांचे चरित्र लिहिले आहे. याची प्रस्तावना संगणक तज्ज्ञ विजय भटकर तर उपोद्घात महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांनी लिहिलेला आहे. ते मुळातूनच वाचायला हवेत. दोघांनी हे पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. 

तिवारी यांना हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मंडाले येथे २००५ मध्ये भेट दिली त्यावेळी मिळाली. प्रत्यक्षात ऑगस्ट २०१६ साली त्यांनी हे लेखन सुरु केले. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यमध्ये पहिल्या भागात १५ प्रकरणे आहेत. तिवारी यांनीही १५ प्रकरणांतून गीतारहस्याची मूळ रचना आणि त्यातील टिळकांचे विचार काळजीपूर्वक अगदी कसोशीने जसेच्या तसे, परंतु आजच्या आधुनिक योगाच्या भाषेत व शैलीत लिहिले आहेत. इंटरनेटवरून घेतलेल्या अत्यंत पूरक चित्रे, माहितीने वाचकांच्या बुद्धीला, विचारांना चांगली चालना मिळते. भारतातील आणि जगातील १५६ नामवंत विद्वानांच्या पुस्तकातील विचार, टिळकांच्या  विचारांचे अधिक स्पष्टीकरण करण्यासाठी दिले आहेत. 

तिवारी यांच्या पुस्तकातील १५ प्रकरणांची शीर्षके वाचली तर पुस्तकाची दिशा व हेतू स्पष्ट होतो. पहिल्या प्रकरणाचे नाव आहे, अमृताची कुपी. तर पुढच्या प्रकरणाची नावे आहेत, प्रत्येक पेचावरील चतुर तोडगा, कर्मयोगशास्त्र, सुखाचा ध्यास, अंतर्गत कारभार, बीज आणि माती, विश्वाचे कोडे, प्रकृतीची टांकसाळ, अध्यात्म, तुम्हीच व्हा तुमच्या भविष्याचे शिल्पकार, योग्य निवड, मार्गदर्शन गुरु, भक्तीमार्ग, विचारधारा आणि शेवटचे पंधरावे प्रकरण विश्वनिर्मितीची तत्वे. पुस्तकाचा समारोप कर्मासंबंधीच्या एक अज्ञात कवीच्या कवितेने केला आहे. वानगीदाखल त्यातील शेवटचे कडवे देतो,


देवाने माणसाला घडवला ते कर्म करण्यासाठी

कर्म करणे हे माणसाचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे

कर्म तनामनावर सर्वात जास्त ताण आणते

कर्म मनोधैर्य चांगले उंचावतेही

कर्म रोग, आजार पळवूनही लावते

कर्माकडे लक्ष दिले नाही तर

तुम्ही काळजी, भीती, शंका यांना निमंत्रण देता

कर्जात भर घालता, कर्म हा सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे.


अरुण तिवारी यांनी परिचयामध्ये पुस्तक का लिहावेसे वाटले त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तरुणमनावर सध्या प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि माहितीचे मायाजाल अविरत मारा करून, त्यांच्या मनात चांगले काय आणि वाईट काय, यासंबंधी प्रचंड संदेह- खरेतर सावळागोंधळच निर्माण करीत आहे. तो पाहून गीतारहस्य प्रकाशित झाले त्याला शंभर वर्षे उलटून गेल्यानंतरही हे त्याचे आधुनिक अर्थान्तरण करणारे पुस्तक वाचकांसमोर ठेवण्याची प्रेरणा मिळाली. आज या तरुणांच्या मनाचा लंबक चांगले- वाईट, बरोबर- चूक, शहाणपणा- वेडेपणा यांच्यामध्ये आंदोलित होऊच दिला जात नाही. आजचा संघर्ष हा चांगले आणि वाईट यामध्ये नाहीच. तो दोन प्रकारच्या वाईटांमध्येच आहे.

कर्मे करावीत की सोडून द्यावीत हा गीतेच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रश्न आहे, तो सांप्रत काळी अस्तित्वातच नाही. लोकांच्या मनात बेगडी पर्याय आणि अनावश्यक निवडी यांचे असे काही दाट जाळे विणले गेले आहे की काही करणे आणि सोडून देणे- धर्म आणि कर्मत्याग यात फारसा फरक उरला नाही. अशावेळेस गीतारहस्य जे लोकांना स्वतःचा, स्वतःला, उपजत प्रेरणेने चांगल्या वाईटातील, चूक किंवा बरोबर यातील फरक समजावून सांगते आणि हा ग्रंथ तोच उद्देश, तोच विचार केंद्रस्थानी ठेवून लिहिला आहे. आता आपण प्रत्येक प्रकरणात जे महत्त्वाचे विचार आले आहेत ते पाहूया.

० १८ पर्वांचे प्रचंड महाकाव्य महाभारत, त्यातील सहावे पर्व भीष्मपर्व, त्यातील २५ ते ४२ ही प्रकरणे म्हणजे सातशे श्लोकांची भगवद्गीता. अतिशय श्रेष्ठ अशा अर्थाचे हे सातशे श्लोक जेव्हा हाली लागले तेव्हापासून ते विद्वत्तेचा पाया ठरले आणि मेरुमणीही. तेव्हापासून त्या त्या काळातील विद्वानांनी गीतेवर भाष्य लिहिले. गीता काय सांगते या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक विद्वानांच्या भाषेत निराळे असलेले दिसून येते.

० ज्ञानेश्वरी हा गीतेवर आधारित भारतीय तत्वज्ञानाचे मूळ तत्त्वे विशद करून सांगणारा एकमेव ग्रंथ आहे.

० महाभारत हा ग्रंथ असा आहे की यात आहे, तेच इतर ठिकाणी आहे. यात नाही ते इतर कोठेही नाही.

० मानव हा या विश्वातील वैशिष्ट्यपूर्ण सजीव आहे. कारण या विश्वात अन्य कोण कोणालाही नसलेली आकलनाची, विचार करण्याची, सभोवतालच्या वास्तवाची दखल घेण्याची शक्ती, शिवाय कल्पनाशक्ती ही फक्त त्यालाच आहे.

० गोडी किंवा इच्छा पाहिजे, पण ती यशाची असावी आणि व्यसनही पाहिजे, पण ते विद्येचे असावे. ते गर्द्य नाही.

० कारकुनाचे काम करताना ते एक कारकून म्हणून करू नका. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून करा. काम मोठ्या मनाने केले म्हणजे ते मोठे होते. कोत्या मनाने केले की हलके, खालच्या दर्जाचे होते. काम लहान किंवा महान नसते, मन लावून जे काम केले जाते, ते लहान की महान हे मन ठरवते. घरी तुमची आई स्वयंपाक करते. पगारी स्वयंपाकीही स्वयंपाक करतो. स्वयंपाक तोच पण तो करताना दोघांच्या मनातील भावना निराळ्या. त्या भावना, ते मन महत्वाचे. हा विषय कर्मयोग याच पद्धतीने समजावतो. मग हे जे महत्त्वाचे मन आहे ते श्रीमंत, संपन्न, उमदे कसे बनवायचे. त्याला बंधमुक्त स्वतंत्र कसे करायचे, तेच काम आपल्याला करायला हवे.

० समृद्धी प्राप्त करणे, आपली विहित कर्मे आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य त्याच समबुद्धीने पार पाडणे हे दोन सिद्धांत वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकमान्यांनी गीता अगदी निराळ्या पद्धतीने वाचकांसमोर ठेवली आहे. त्यांनी उघड केलेले ते गीतारहस्य वाचताना महान अमेरिकन कवी हेन्री डेव्हिड थोरो यांच्या पुढील वचनाची प्रचिती येते.

‘जमिनीवर एकच पाऊल ठेवून पायवाट तयार होत नाही, तसेच एखादाच विचार मनातही विचारांची चाकोरी आखू शकत नाही. पक्की पायवाट बनायला पण त्याच वाटेवरून पुन्हा पुन्हा चालतो, तसेच ज्या विचारांच्या चाकोरीत आपला आयुष्याचा प्रवास चालावा, अशी आपली इच्छा असेल ती चाकोरी चांगली स्पष्ट व्हायला ते विचार मनात वारंवार घोळवावे लागतात.’

० गीतेतील तत्वे सखोल विचार करण्यास प्रवृत्त करतात. त्यातील वर्णने अभ्यास करणाऱ्याला आयुष्याच्या निरनिराळ्या पैलूंचे दर्शन घडवितात. लोकमान्यांचे गीतारहस्यात वेद, उपनिषदे. स्मृती ग्रंथ असे अमोल अतिप्राचीन साहित्य, इतिहास आणि काव्य या सर्वांमधील संपन्न असे ज्ञान भांडार वाचकांसाठी खुले केले आहे. आणि आजच्या पिढीला त्यावरून स्वतः प्रयोग करून निष्कर्षापर्यंत येण्यास, स्वतःची मते बनवावयास सांगितले आहे.

० लोकमान्य या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट करतात की ‘गीतेच्या अठरा अध्यायांची ही संगती सांगितली, त्यावरून गीता म्हणजे कर्म भक्ती व ज्ञान या तीन स्वतंत्र निष्ठांची खिचडी किंवा कापूस, रेशीम व जर यांच्या चिंध्या शिवून तयार केलेली गोधडी नसून कापूस रेशीम व जर यांचे निराळे धागे यथास्थानी बसवून दिल्यावर कर्मयोग नावाचे मौल्यवान व मनोहर असे हे गीतारुपी सणंग अव्वलपासून अखेरपर्यंत अत्यंत योग्ययुक्त चित्राने सलग विणलेले आहे असे दिसून येईल.’

संपूर्ण मानव जातीला अज्ञानाच्या दलदलीतून बाहेर काढून शुद्ध मनाच्या प्रकाशात आणण्यासाठी अर्जुनाच्या रणांगणावरील संभ्रममुक्तीच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी दिलेल्या सर्वश्रेष्ठ, उदात्त, ईश्वरी संदेशाचे लोकमान्य प्रतिनिधित्व करतात. भगवद्गीतेतील त्रिकालाबाधित ज्ञान व विवेकी शहाणपण यांचे अमृत लोकमान्यांनी त्या भगवद्गीतेचे मंथन करून भारतीयांच्या भावी पिढ्या आणि भारतीय संस्कृतीतील आदर्शामध्ये दिलासा शोधण्यासाठी गीतारहस्याच्या रुपाने उपलब्ध करून दिले आहे, असे अरुण तिवारी सांगतात.

ते म्हणतात, लोकमान्यांमध्ये मला भारतीय संस्कृतीचे तेज बाहेर फेकणारा सूर्य दिसतो आणि माझे मार्गदर्शक गुरु डॉ. अब्दुल कलाम यांच्यामध्ये त्या सूर्याच्या परावर्तित प्रकाशाने चमकणारा चंद्र दिसतो आणि ते स्वतः बद्दल म्हणतात मी एक ताराही नाही, गुरुही नाही. परंतु मी ज्या प्रकाशात न्हालो, त्यातील काही किरण, माझ्या देशाच्या महानतेचा वारसा मी आमच्या तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा जरा धाडसीच प्रयत्न केला आहे. आजवर ज्ञान हीच आपल्या भारतीयांची शक्ती असल्याचे सिद्ध झाले आहे. समग्र व सखोल विचार, चुकांची दुरुस्ती आणि स्वतः मध्ये सुधारणा या काही गोष्टी आम्हा भारतीयांच्या रक्तातच आहेत. आपण मूलतःच स्वतंत्र वृत्तीचे आहोत. मी तर म्हणेन की या भारतभूमीत जे जन्म घेतात ते या पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान लोक आहेत.

त्यांनी पुस्तकाचा शेवट, श्रीमद्भगवद्गीता हे त्या परब्रह्माचे सर्वात सुगम, सुबोध, सुस्पष्ट असे दर्शन आहे, त्या विवरणाचा अर्थ लोकसंग्रहार्थ, मानवजातीच्या कल्याणासाठी समजावून सांगण्याचे महान कार्य करण्यासाठीच बाळ गंगाधर टिळक या महात्म्याने पृथ्वीतलावर जन्म घेतला होता, हे सांगून केला आहे. श्री. तिवारी यांचा हा प्रयत्न समजून घेण्यासाठी त्यांच्या पुस्तकाचे वाचन करायला हवे. या ग्रंथाचा अनुवाद सर्व भारतीय भाषांमध्ये व्हायला हवा. त्यादृष्टीने वाचक हा ग्रंथ वाचतील व आपापल्या भाषेत अनुवाद करण्यासाठी पुढे येतील, अशी इच्छा व्यक्त करून थांबतो.

(लेखक निवृत्त शिक्षणाधिकारी आहेत.)