Goan Varta News Ad

राज्य सरकारने हॉटेल व्यावसायिकांना सूट द्यावी : कोटा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
20th September 2020, 12:18 Hrs

मडगाव : गोव्यातील लघू व मध्यम हॉटेल व्यावसायिकांना अबकारी खात्याकडून १ एप्रिलपासूनची पूर्ण वर्षाची परवाना फी भरण्यास सांगण्यात येत आहे. करोनामुळे अद्याप व्यवसाय कधी सुरू होणार ते ही माहीत नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून व्यावसायिकांना सूट मिळावी, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष सेराफिनो कोटा यांनी केली आहे.
गोवा लघू व मध्यम हॉटेल व्यावसायिक असोसिएशनतर्फे मडगाव येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष सेराफिनो कोटा यांनी लघु व मध्यम हॉटेल व्यावसायिकांची सध्याची परिस्थिती मांडली. कोटा म्हणाले, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंदावस्थेत आहे. पर्यटक राज्यात येत नसल्याने हॉटेल व्यावसायिक आधीच आर्थिक अडचणीत आलेले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार १ सप्टेंबरपासून केवळ बार खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यात सध्या पर्यटक येत नसल्याने हॉटेलमधील बारनाही ग्राहक मिळत नाहीत. त्यातच आता अबकारी खात्याकडून २ टक्के लेट फीसह परवान्यांसाठीची रक्कम अदा करण्याचा तगादा लावला जात आहे. परवान्यांसाठी लावण्यात आलेली फी ही खूप जास्त आहे. केवळ बारवाल्यांसाठी परवान्यांची फी बारा ते जास्तीत जास्त १५ हजार इतकी आहे. मात्र, लघु व मध्यम हॉटेल व्यावसायिकांसाठी परवान्यासाठीची फी ६० हजार ते ८० हजार इतकी आकारण्यात आलेली आहे. अबकारी खात्याकडून वर्षभराची परवाना फी मागितली जात आहे.
देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेल्या कालावधीत हॉटेल व्यावसायिकांना ग्राहक लाभलेले नाहीत. लॉकडाऊनच्या कालावधीतील फीदेखील भरण्यास सांगितले जात आहे. सध्या हॉटेल्स बंद आहेत. राज्यात पर्यटक येत नसताना अशावेळी सरकारकडून बार परवान्यासाठीची फी भरण्याची हॉटेल व्यावसायिकांकडे होणारी मागणी चुकीची असून या फीमध्ये सूट मिळावी. _सेराफिनो कोटा, अध्यक्ष, लघू व मध्यम हॉटेल व्यावसायिक असोसिएशन