Goan Varta News Ad

५० हजारांच्या बदल्यात ३ लाखांचे बनावट चलन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th September 2020, 09:32 Hrs
५० हजारांच्या बदल्यात ३ लाखांचे बनावट चलन

- पंजाबात व्यवहार झाल्याची संशयितांची कबुली 

- न्यायालयाकडून आठ दिवसांचा पोलिस रिमांड 

- प्रकरणाची मोठी व्याप्ती शक्य, त्या दिशेने तपास 

पणजी : येथील शहर पोलिसांनी बनावट चलन प्रकरणी अटक केलेल्या संशयितांनी पंजाबमधून ५० हजार रुपये देऊन ३ लाखांचे बनावट चलन घेतल्याची माहिती समोर आली आहे. अटकेतील संशयितांना न्यायालयाने ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या  प्रकरणी पंजाबातही चौकशी होण्याची शक्यता आहे. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पणजीतील एका आईस्क्रिम पार्लर मालकाने सोमवारी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एका ग्राहकाने बनावट चलन देऊन आईस्क्रिम खरेदी केले. त्यावरून पणजी पोलिसांनी तपास केला असता बनावट नोटा खपवणारी टोळीच कार्यरत असल्याचे समोर आले. तसेच सदर व्यक्ती कळंगुट येथील एका बॉलिवूड अभिनेत्याच्या तारांकित हॉटेलवर राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या माहितीवरून पोलिस पथकाने दुपारी सदर हॉटेलवर छापा टाकला. या वेळी पथकाने २ लाख ९६ हजार ४०० रुपये मुल्याच्या १००, २०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलिसांनी पंजाब येथील राजदीप सिंग, गगनदीप सिंग, हरजीत सिंग, राहुल लुत्रा आणि अनुराग कुमार या पाच पर्यटकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांना मंगळवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता आठ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक साहिल वारंग पुढील तपास करित आहेत. 

* संशयित राजदीप सिंग याचे पंजाब येथे किरणा मालाचे दुकान असून, त्याने तेथील एका व्यक्तीला ५० हजार रुपये देऊन तीन लाख रुपयांचे बनावट चलन घेतले. 

* तसेच त्याचा धाकटा भाऊ गगनदीप याचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले असून, सर्व कुटुंबीय आठ दिवसांआधी गोव्यात पर्यटनासाठी आल्याची माहिती समोर आली आहे.