पणजी : गोव्यात दर्जेदार पायाभूत सुविधा, विमानतळे, बंदरे आणि रस्ते उद्योगांसाठी उपयुक्त ठरत असून, राज्य सरकारने उद्योगस्नेही धोरणे तयार केली आहेत. ‘व्हायब्रंट गोवा’च्या माध्यमातून गोव्याला व्यवसाय, नवोपक्रम आणि गुंतवणुकीसाठी जागतिक स्तरावरील महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचे ध्येय आहे. गुंतवणूकदारांनी या संधीचा लाभ घेत गोव्यात मोठी गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये गुरुवारी ‘व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिझनेस समिट २०२६’चे थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या या परिषदेत उद्योगजगतातील प्रमुख व्यक्ती, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि धोरणकर्ते सहभागी झाले आहेत. उद्घाटनावेळी खासदार सदानंद शेट तानावडे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राजकुमार कामत, हिरो एंटरप्रायझेसचे सुनील कांत मुंजाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या व्हायब्रंट गोवा परिषदेत जगभरातील ५० देशांतील ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत, ही गोव्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २०१९ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाने व्यावसायिक भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला मोठी चालना दिली आहे. गोव्यातील उद्योगक्षेत्रात गुंतवणूक, तांत्रिक प्रगती आणि नावीन्य आणण्यासाठी ही मोठी संधी आहे. तरुण उद्योजकांनी आपला व्यवसाय जागतिक पातळीवर नेण्यासाठी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
२०४७ च्या विकसित भारताच्या उद्दिष्टाआधीच २०३७ पर्यंत विकसित गोवा निर्माण करण्याचे राज्य सरकारचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, २०२४-२५ या आर्थिक वर्षात गोव्याचे सकल राज्यांतर्गत उत्पादन (जीएसडीपी) १.१२ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि राष्ट्रीय सेमीकंडक्टर मिशनसारख्या धोरणांमुळे उद्योजकांना नव्या संधी मिळत आहेत.
‘गोवा स्टार्टअप पॉलिसी २०२५’च्या माध्यमातून स्थानिक सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यावर सरकारचा भर आहे. गोव्याला इलेक्ट्रॉनिक्स, हरित ऊर्जा, सागरी अर्थव्यवस्था आणि शाश्वत पर्यटनाचे जागतिक केंद्र बनवण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
- या शिखर परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आफ्रिकी देशांचे उच्चायुक्त आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘द फ्युचर ऑफ आफ्रिका’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
- ‘इन्व्हेस्ट इन गोवा’, ‘मेड इन इंडिया’, ‘पणजी रोडमॅप टू नेट झिरो’ आणि ‘बिझनेस गोवा’ यांसारख्या प्रकाशनांचे तसेच ‘विकसित गोवा, व्हायब्रंट गोवा’ अहवाल व अॅपचे अनावरण झाले.
- ब्रिक्स-आसियान चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्हायब्रंट गोवा फाउंडेशन यांच्यात महत्त्वाचे सामंजस्य करारही करण्यात आले.


