उपअधीक्षकांची २६ रिक्त पदे थेट ऐवजी बढतीने भरणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th October, 11:24 pm
उपअधीक्षकांची २६ रिक्त पदे थेट ऐवजी बढतीने भरणार

गोवा पोलीस सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकारी (उपअधीक्षक) गटातील २६ रिक्त पदे थेट भरतीऐवजी बढतीच्या प्रक्रियेतून भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतचा आदेश कार्मिक खात्याचे अवर सचिव दुर्गा किनळेकर यांनी जारी केला आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत थेट भरतीसाठी आता १४ पदे रिक्त राहणार आहेत.

७० उपअधीक्षक संवर्गातील मंजूर पदे
२६ बढतीने भरण्यास मंजुरी दिलेली पदे
४५ बढतीची संधी मिळणारे पोलीस निरीक्षक
१४ थेट भरतीसाठी शिल्लक राहणारी पदे

गोवा पोलीस सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकारी (उपअधीक्षक) गटासाठी ७० पदे मंजूर आहेत. त्यात संवर्गातील ६८ आणि संवर्गाबाहेरील दोन पदांचा समावेश आहे. सध्या पोलीस खात्यात ११ उपअधीक्षक कार्यरत आहेत. त्यात अनुसूचित जमातीचे चार, तर अनुसूचित जातीचा एक उपअधीक्षक आहे.

यापूर्वी बढती पद्धतीतील १९ पदे रिक्त होती. दरम्यान, सरकारने थेट भरतीसाठी असलेली आणखी २६ पदे बढतीने भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत एकूण ४५ उपअधीक्षक पदांवर नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परिणामी, पोलीस खात्यातील ४५ निरीक्षकांना बढती मिळण्याची शक्यता आहे.

बढतीनंतर उपअधीक्षकांची संख्या ५६ होणार सध्या कार्यरत असलेले ११ उपअधीक्षक आणि बढती मिळणारे ४५ निरीक्षक यांची एकत्रित संख्या ५६ होईल. त्यामुळे मंजूर ७० पदांपैकी थेट भरतीसाठी १४ पदे रिक्त राहतील.

ज्येष्ठता यादीमुळे बढतीचा मार्ग मोकळा

पोलीस खात्यात २००२ मध्ये भरती झालेल्या उपनिरीक्षकांना दिलेली हंगामी बढती नियमित ठरवून त्यांची ज्येष्ठता यादी २०१३ पासून तयार करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार, खात्याने गोवा पोलीस आणि भारतीय राखीव दलातील निरीक्षकांची एकत्रित ज्येष्ठता यादी तयार केली आहे.

या नवीन ज्येष्ठता यादीनुसार ४५ निरीक्षकांना उपअधीक्षक पदावर बढती देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे पोलीस खात्यातील बढती प्रक्रिया पुढे सरकण्याची शक्यता आहे.

पदांची सद्यःस्थिती
तपशील संख्या
मंजूर एकूण पदे ७०
सध्या कार्यरत उपअधीक्षक ११
बढतीसाठी उपलब्ध होणारी पदे ४५
बढतीनंतर अपेक्षित एकूण संख्या ५६
थेट भरतीसाठी शिल्लक पदे १४
हेही वाचा
सर्व पहा