कारवार : गोव्याहून मंगळुरूकडे विनापरवाना मद्याची वाहतूक करणाऱ्या कारवार जिल्ह्यातील चौघांना उडुपी जिल्ह्यातील पडुबिद्री पोलिसांनी अटक केली आहे. हेजमाडी टोलनाक्याजवळ केलेल्या कारवाईत २,५८३ लिटर मद्य जप्त करण्यात आले.दोन्ही वाहनांसह एकूण मुद्देमालाची किंमत २२.३५ लाख रुपये आहे.
अटक केलेल्यांमध्ये किन्नार येथील विनय (४७), नंदनगड्डा येथील गजानन महाबळेश्वर नाईक (४५), आमदळ्ळी येथील सुजित तळेकर (२५) आणि शिरवाड येथील लॉरेन्स थॉमस मेंडोन्स (४९) यांचा समावेश आहे.
गोव्याहून मंगळुरूकडे मद्य घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनाला एस्कॉर्ट करणारी मारुती स्विफ्ट कारही पोलिसांनी जप्त केली. जप्त केलेल्या मद्याची किंमत १४.३५ लाख रुपये आहे. दोन्ही वाहनांसह एकूण मुद्देमालाची किंमत २२.३५ लाख रुपये आहे.
अटक केलेल्या विनय याच्याविरुद्ध चिताकुल, कारवार ग्रामीण आणि अबकारी पोलीस ठाण्यांत यापूर्वीही अबकारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कार्कळ उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक इशिता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पडुबिद्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.


