कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, त्यात हमखास विचारले जाणारे प्रश्न म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा, वास्तुशास्त्र किंवा शिक्षक भरती यांसारख्या सरळसेवेच्या परीक्षा सोडल्यास इतर बहुतांश सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. यूपीएससी, बँकिंग, रेल्वे, एनडीए यांसारख्या परीक्षांमध्ये या घटकाला विशेष महत्त्व असते. चालू घडामोडींचा अभ्यास कितीही केला तरी तो अपुराच वाटतो; कारण दर सेकंदाला जगभरात काही ना काही घडत असते. अशा वेळी 'नक्की काय आणि कसे लक्षात ठेवायचे?' हा मोठा प्रश्न निर्माण होतो, ज्यामुळेच चालू घडामोडींचा अभ्यास करणे हे कौशल्याचे आणि ट्रिकी काम ठरते.
'चालू घडामोडी' किंवा 'करंट अफेअर्स' म्हणजे साधारणपणे परीक्षेच्या दिवसापासून मागील एक ते दीड वर्षाच्या कालावधीत घडलेल्या महत्त्वाच्या घटना होय. रोज वर्तमानपत्र उघडले की देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील किमान २० तरी नव्या बातम्या समोर येतात. मागील ५०० दिवसांमधील अशा हजारो बातम्या लक्षात ठेवणे ही एक प्रकारची कसरतच आहे, परंतु यातूनच योग्य मार्ग काढायचा असतो. स्थानिक किंवा शहरातील छोट्या-मोठ्या बातम्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वर्ज्य मानल्या जातात. त्याऐवजी राज्यपाल पातळीवरील तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींवर भर देणे इष्ट ठरते. यासाठी अभ्यासाची योग्य 'फिल्टर्स' लावणे आवश्यक आहे.
अभ्यासाच्या नियोजनासाठी एक स्वतंत्र १०० पानांची वही करावी आणि 'लिहिल्याने जास्त लक्षात राहते' या तत्त्वाचा वापर करून स्वतःच्या हाताने नोट्स काढाव्यात. या वहीची विभागणी शहर, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय अशा चार विभागांत करावी. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी ५० ते १०० पाने अशा प्रकारे जास्त जागा ठेवावी. बातम्यांचे स्वरूप पाहून त्या त्या विभागामध्ये त्यांची नोंद करत जावी.
यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांचे सेक्रेटरी, अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची माहिती आवर्जून लिहावी. यामध्ये संस्थेचे नाव, बदललेले नाव, स्थापना वर्ष व सनावळ, माजी अध्यक्ष तसेच आद्य व आजी पदाधिकारी यांची नोंद असावी. उदा. रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग, स्टेट बँक ऑफ इंडिया, रेल्वे मंत्रालय, आधार केंद्र, भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), आयआयटी, परराष्ट्र मंत्रालय, योजना आयोग, नीती आयोग, आयकर विभाग, मुख्य न्यायमूर्ती, कायदे आयोग, सर्वोच्च न्यायालय, विविध उच्च न्यायालये, इंडियन बार कौन्सिल, अॅटर्नी जनरल, भारतरत्न, पद्मश्री व पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती, बजेट व वित्त विभाग, संरक्षण दलांचे प्रमुख, सीबीआय, ईडी इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे तक्ते (कोष्टक) तयार करावेत.
तसेच एका तक्त्यामध्ये शासकीय जुन्या व नवीन योजना, त्यांची नावे, उद्दिष्टे, अंमलबजावणीचे वर्ष आणि धोरण प्रमुख यांचा समावेश करावा. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना वेगवेगळ्या नोंदवाव्यात. शासकीय स्तरावर निराधार महिला, मागासवर्गीय, शोषित-पिडित, महिला व बालविकास, वंचित घटक, अपंग आणि कामगार यांच्यासाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व्यवस्थित संकलित करावी. मागील वर्षात संमत झालेले नवीन कायदे, कायद्याचे नाव, वर्ष आणि त्यामागचा हेतू यांची स्पष्ट नोंद असावी.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सात खंडांच्या वर्गवारीनुसार त्या त्या खंडातील देशांमधील घडामोडी लिहाव्यात. राष्ट्रप्रमुख, पक्षप्रमुख, त्यांची नियुक्ती आणि कार्यकाळ यांची नोंद करावी. आंतरराष्ट्रीय संस्थांची एक स्वतंत्र सूची तयार करून त्यांचे प्रमुख, कार्य, उद्दिष्टे आणि आजी-माजी अध्यक्षांची नावे नोंदवून ठेवल्यास चालू घडामोडींचा अभ्यास अधिक प्रभावी व सोपा होतो.

अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)


