महिला सक्षमीकरणासाठी सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात, आर्थिक सहाय्य देण्यात येतात. पण गुजरातमधील केवाडियाचा कायापालट केला जात असताना महिलांना केवळ आर्थिक सहाय्य न देता त्यांना प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी दिल्या. आदिवासी वसाहतीतील महिलांना घराचा उंबरठा ओलांडून स्वावलंबनाचा विश्वास दिला. हाच विश्वास पर्यटन राज्य असलेल्या गोव्यातील महिलांना मिळून लखपती दीदी करण्याचा सरकारचा संकल्प पूर्ण व्हावा यावर लक्ष देण्याची गरज आहे.
काही दिवसांपूर्वी गुजरात राज्यातील केवाडिया भागाचा दौरा करण्याची संधी मिळाली. २०१८ मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीची स्थापना झाल्यापासून आदिवासी समाजाची वसाहत असलेल्या या भागाचा विकास करण्यात येत आहे. केवाडियाची ओळख आता एकतानगर म्हणून जगभरात होत आहे. त्याचवेळी आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे याठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक आदिवासी महिलांना रोजगाराच्या माध्यमातून त्यांच्या पायावर उभे करण्यात आलेले आहे. पर्यटन, वाहतूक, खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि इतर पर्यटनाच्या क्षेत्रात महिलांना संधी देण्यात आलेली आहे.
महिला सक्षमीकरण हा केवळ सामाजिक विकासाचा विषय नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीशी थेट जोडलेला मुद्दा आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना रोजगार, कौशल्यविकास आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून दिल्यास त्याचा परिणाम कुटुंबापासून स्थानिक अर्थव्यवस्थेपर्यंत दिसून येतो. गुजरातमधील केवडिया अर्थात एकतानगर परिसरात पर्यटन विकासाशी स्थानिक महिलांना जोडण्यात आलेला प्रयोग या दृष्टीने गोव्यासाठी विचार करण्यासारखा ठरू शकतो. अनेक वर्षांपासून जंगलमय परिसरात राहणार्या आदिवासी महिला आता सहजरित्या विविध कामे करताना दिसतात.
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या स्थापनेनंतर एकतानगर परिसरात पर्यटनाशी संबंधित विविध उपक्रम विकसित झाले. स्थानिक महिलांना ई रिक्षा चालक, पर्यटक मार्गदर्शक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि उद्योजिका म्हणून संधी मिळाली. पर्यटन विकास आणि महिला रोजगार यांची सांगड घालण्याचा हा दृष्टिकोन गोव्याच्या परिस्थितीनुसार स्वीकारता येऊ शकतो.
गोवा हे देशातील प्रमुख पर्यटन केंद्रांपैकी एक असल्याने मिरामार, कलंगूट, बागा, जुने गोवे, आयकॉनिक बीच कोलवा, बाणावली यासारख्या पर्यटनस्थळांवर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र ई रिक्षा किंवा टॅक्सी सेवा सुरू केल्यास स्थानिक महिलांना वाहतूक क्षेत्रात रोजगाराची संधी मिळू शकते. काही संस्थांच्या माध्यमातून राज्य सरकारने यात पुढाकार घेतला असला तरी अजूनही लक्ष वेधण्याइतपत काम यात झालेले नाही.
महिलांसाठी वाहन खरेदीसाठी सुलभ कर्ज, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिल्यास हा उपक्रम अधिक प्रभावी ठरू शकतो. महिला पर्यटकांसाठीही अशा सेवांचा उपयोग होऊ शकतो. गोव्याची ओळख ही केवळ समुद्रकिनार्यांपुरती मर्यादित नसून किल्ले, चर्च, मंदिरे, संग्रहालये आणि पोर्तुगीजकालीन वास्तूंचा समृद्ध वारसा राज्याला लाभला आहे. या वारशाची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवतींना विशेष प्रशिक्षण देऊन महिला पर्यटक मार्गदर्शकांची स्वतंत्र फळी उभारता येऊ शकते.
इतिहास, स्थानिक संस्कृती, परदेशी भाषा आणि संवादकौशल्य यांचे प्रशिक्षण देऊन प्रमाणित अभ्यासक्रम सुरू केल्यास युवतींना रोजगाराची नवी संधी मिळू शकते. पर्यटनाशी संबंधित कौशल्यविकासासाठी पर्यटन विभाग, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वयाची गरज आहे.
गोव्याची पारंपरिक खाद्यसंस्कृती ही पर्यटनाचे महत्त्वाचे आकर्षण आहे. स्थानिक रापणकार पकडणारे मासळी, विविध पारंपरिक पदार्थ, बेबिंका तसेच घरगुती खाद्यपदार्थांना पर्यटकांमध्ये मागणी आहे. या क्षेत्रात महिला बचतगटांना अधिक संधी देण्याची आवश्यकता आहे. एकतानगर परिसरात नव्याने उभारणी करण्यात आलेल्या विविध गार्डन्समध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी केवाडियाच्या परिसरासह गुजरातमधील पदार्थांची उपलब्धता केली असून त्याठिकाणी आशा या महिला बचतगटांना कामे दिलेली आहेत. एकेका ठिकाणी ४० पेक्षा जास्त महिलाही काम करताना दिसतात. त्याचप्रमाणे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, धबधबे आणि ग्रामीण पर्यटन केंद्रांवर महिला बचतगटांना खाद्यपदार्थ विक्रीसाठी नियोजित जागा उपलब्ध करून दिल्यास स्थानिक महिलांना थेट उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो. त्यातून ग्रामीण पर्यटन आणि घरगुती खाद्यव्यवसायालाही चालना मिळू शकते.
राज्यातील महिलांकडून तयार होणार्या हस्तकला वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळणे हे आणखी एक आव्हान आहे. नारळाच्या विविध भागांपासून तयार होणार्या वस्तू, मातीची उत्पादने, कुणबी कापडापासून तयार केलेल्या वस्तू, स्थानिक खाद्यपदार्थ आणि इतर पारंपरिक वस्तूंच्या विक्रीसाठी महिला उद्योजिकांना स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देता येऊ शकते. ज्यामुळे पर्यटनाच्या स्थळांवर महिलांचे स्थान आणखी बळकट होउ शकते.
रेल्वे स्थानके, विमानतळ, बसस्थानके आणि प्रमुख पर्यटनस्थळांवर स्थानिक महिला उत्पादकांना विक्रीसाठी जागा उपलब्ध झाल्यास मध्यस्थांची संख्या कमी होऊन उत्पादकांना थेट आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सध्या ज्या जागा उपलब्ध केलेल्या आहेत, त्या व्यावसायिक स्तरावर योग्य म्हणता येणार नाहीत. त्यामुळे याबाबत गांभीर्य असणे गरजेचे आहे.
राज्यात जलक्रीडा, सर्फिंग, स्कुबा डायव्हिंग आणि साहसी पर्यटनाला मोठी मागणी आहे. या क्षेत्रात स्थानिक युवतींना पोहणे, जीवरक्षक प्रशिक्षण, जलक्रीडा संचालन आणि पर्यटक सुरक्षा यांचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करता येऊ शकतात. विशेष प्रशिक्षण, प्रमाणपत्र आणि सुरक्षित कामाचे वातावरण उपलब्ध करून दिल्यास अधिक तरुणी या क्षेत्राकडे वळू शकतात.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे पर्यटन व्यवसायाच्या प्रचारासाठीही मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. स्थानिक तरुणींना सामाजिक माध्यम व्यवस्थापन, डिजिटल छायाचित्रण, पर्यटनविषयक लेखन आणि व्हिडिओ निर्मितीचे प्रशिक्षण देऊन गोव्याच्या पर्यटनस्थळांचा डिजिटल प्रचार करण्यासाठी त्यांचा सहभाग वाढविता येऊ शकतो. स्थानिक पर्यटन व्यवसायांना डिजिटल पातळीवर प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षित तरुणी स्वतंत्र सेवा व्यवसायही सुरू करू शकतात.
महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना सुरक्षित वातावरणाची हमीही तितकीच महत्त्वाची आहे. हॉटेल, घरगुती निवासव्यवस्था, पर्यटन केंद्रे आणि इतर आदरातिथ्य क्षेत्रात महिलांना व्यवस्थापन व सुरक्षा क्षेत्रात अधिक संधी देता येतील. शाळा आणि महाविद्यालयांमधील मुलींना स्वसंरक्षण, कार्यस्थळी सुरक्षितता आणि कायदेविषयक मूलभूत माहिती देण्यावरही भर देणे आवश्यक आहे.
गोव्यात महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र, आर्थिक मदतीसोबतच महिलांना कौशल्यविकास, बाजारपेठ, कर्जसुविधा आणि उद्योजकतेशी जोडण्याची गरज आहे. महिलांना केवळ आर्थिक सहाय्य मिळण्याऐवजी त्या आपला व्यवसाय उभा करून रोजगारनिर्मिती करणार्या उद्योजिका बनतील, अशी धोरणात्मक दिशा आवश्यक आहे. एकतानगरच्या अनुभवातून गोव्यासाठी एक महत्त्वाचा धडा मिळतो. पर्यटनाचा विकास आणि स्थानिक महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे स्वतंत्र विषय न ठेवता त्यांची सांगड घालता येते. गोव्याच्या पर्यटनस्थळांवर स्थानिक महिला आणि तरुणींना चालक, मार्गदर्शक, उद्योजिका, खाद्यव्यवसायिक, कारागीर आणि साहसी पर्यटन प्रशिक्षक म्हणून संधी मिळाल्यास त्याचा फायदा महिला सक्षमीकरणाबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही होऊ शकतो. राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांनुसार असा स्थानिक नमुना विकसित करण्यासाठी सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, पर्यटन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गट यांच्यात समन्वयाची गरज आहे. यातून महिला सक्षमीकरणाचा नवा पायंडा गोवा राज्याला घालून देता येईल. केवळ आर्थिक योजनांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करणे हे सक्षमीकरण नसून महिलांना योग्यरित्या मार्गदर्शन, प्रशिक्षण देत त्यांना रोजगारातून स्वयंपूर्णतेकडे नेणे या उद्देशाने काम होण्याची गरज आहे.

अजय लाड, (लेखक गोवन वार्ताचे दिक्षण गोवा ब्युरो चीफ आहेत.)


