CBT-I पेपर कसा सोडवावा? कोणत्या चुका टाळाव्यात?

CBT परीक्षेत सोपे, मध्यम आणि कठीण असा क्रम ठेवून शांत मनाने पेपर सोडवावा. योग्य ताण-व्यवस्थापन, वेळ-व्यवस्थापन आणि प्राणायामाच्या मदतीने ४० ते ४५ गुण सहज मिळू शकतात.

Story: यशस्वी भव: |
03rd October, 10:38 pm
CBT-I पेपर कसा सोडवावा? कोणत्या चुका टाळाव्यात?

CBT अर्थात 'कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट' (Computer Based Test), जी परीक्षा एमसीक्यू (MCQ) पद्धतीने संगणकावर (कॉम्प्युटरवर) सोडवायची असते. कॉम्प्युटर स्क्रीनवर एकूण ६० प्रश्न येतात व त्यांची उत्तरे कॉम्प्युटरवर सिलेक्ट करून सोडवायची असतात. GPSC आणि गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे ज्या ग्रेड-III आणि ग्रेड-IV च्या परीक्षा घेतल्या जातात, त्यांना CBT-1, CBT-2, प्री-स्क्रीनिंग आणि स्क्रीनिंग परीक्षा असे म्हणतात.

स्क्रीनवरून तुम्हाला कोणत्याही विभागातील प्रश्नाकडे जाता येते. तुमच्या निवडीनुसार तुम्हाला हवे ते प्रश्न आधी किंवा नंतर सोडवण्याची मुभा त्यात असते. यात प्रामुख्याने इंग्रजी, कोकणी, मराठी, रिझनिंग (तर्कशास्त्र), न्यूमेरिकल (संख्यात्मक), हिस्टरी ऑफ गोवा (गोव्याचा इतिहास) आणि विषयनिहाय असे प्रश्न असतात. एका प्रश्नाला चार पर्यायी उत्तरे दिलेली असतात; त्यांपैकी १ बरोबर आणि ३ चुकीची उत्तरे असतात.

साधारणपणे ६० प्रश्नांसाठी ७५ मिनिटांचा वेळ असतो. न्यूमेरिकल प्रश्न सोडवताना किंवा एकंदरीतच रफ वर्कसाठी कोरा कागद दिला जातो; ज्यावर अंकगणित किंवा योग्य उत्तरासाठी रफ वर्क करता येते.

एका पेपरमध्ये साधारणपणे ४ विभाग असतात. कोकणी, इंग्रजी, रिझनिंग आणि न्यूमेरिकल हे ते चार सेक्शन आहेत. साधारणपणे इंग्रजीमध्ये व्याकरण, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, पर्यायी शब्द, व्याकरण करेक्शन आणि कॉम्प्रिहेन्शन (उतारा/आकलन) यांवरील प्रश्न विचारले जातात.

कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सोडवताना आधी प्रश्न वाचावेत व नंतर उतारा वाचावा असा क्रम ठेवावा. प्रश्न आधी वाचून उतारा वाचला की वेळ वाचतो आणि प्रश्नाचे उत्तर उताऱ्यात सहज सापडून लगेचच बरोबर उत्तर देता येते. यामध्ये ज्या प्रश्नांना फार विचार करावा लागत नाही, त्यांची उत्तरे पटकन देऊन वेळ वाचवायचा; म्हणजे वाचलेला वेळ कठीण प्रश्नांसाठी वापरता येतो. प्रथम कोकणी (जे पटकन येत असेल ते) आणि नंतर इंग्रजी (जे पटकन येत असेल ते) प्रश्न सोडवावेत. सर्व प्रश्न एकाच वेळी सोडवण्याचा हट्ट करू नये.

वेळेच्या नियोजनासाठी प्रथम अत्यंत सोपे, नंतर मध्यम, त्यानंतर वेळकाढू प्रश्न आणि शेवटी गणिताचे अर्थात 'न्यूमेरिकल' प्रश्न हातात घ्यावेत. या क्रमाने गेल्यास सुयोग्य वेळ-व्यवस्थापन होते आणि सर्वच्या सर्व ६० प्रश्न सोडवून होतात.

येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, ती म्हणजे कोणालाच ६० पैकी ६० गुण मिळत नाहीत; त्यामुळे सर्वच प्रश्न 'आलेच पाहिजेत' हा अट्टाहास धरू नये. साधारणपणे नीट अभ्यास करून शांत डोक्याने पेपर सोडवल्यास ४० ते ४५ गुण मिळू शकतात. जी गणिते अत्यंत कठीण वाटत असतील, त्यांच्यावर फार मेहनत आणि वेळ खर्ची करू नये; त्याने उगाच वेळ वाया जातो.

क्रिकेटमध्ये जसे आपल्याला आवडीचे आणि जमणारे शॉट्स मारायचे असतात व त्यानेच धावसंख्या वाढते, त्याचप्रमाणे येथे आपल्याला नीट जमणाऱ्या किंवा जमू शकणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे व त्यांचा आधी सराव करावा. न्यूमेरिकलचे प्रश्न सर्वांत शेवटी सोडवायला घ्यावेत. त्यातल्या त्यात ज्या प्रश्नांमध्ये सूत्रे, आकडेमोड, लसावि, मसावि, वर्ग, घन यांवर आधारित प्रश्नांचा विचार करायला जास्त वेळ लागतो, ते प्रश्न शेवटी घ्यावेत.

हे सर्व प्रश्न सोडवत असताना मन शांत, अविचल ठेवावे आणि श्वासावर भर द्यावा. कोणताही तणाव घ्यायचा नाही, नाहीतर तणावामुळे स्मृतीभ्रंश होतो आणि मन एकदम ब्लँक व्हायला होते. कधी कधी संपूर्ण प्रश्नांवरून नुसती नजर मारली तरी मन शांत होते, नाहीतर पुढे काय काय विचारले असेल ही उत्सुकतासुद्धा एकाग्रतेला बाधा पोहोचवते. परीक्षेच्या आधीच्या २१ दिवसांत प्राणायामावर भर द्यावा, कारण शांत मनाने कठीण प्रश्नांचीही उत्तरे देता येतात; तर चंचल आणि सतत धावणाऱ्या मनामुळे सोप्या प्रश्नांची उत्तरेही चुकतात.

"माझे २० प्रश्न चुकले तर चुकू दे, पण माझे ४० प्रश्न मला बरोबर सोडवायचे आहेत" ही गोष्ट एकदा मनात पक्की झाली की अर्धा ताण आपोआप निघून जातो. कधीकधी काही प्रश्न नशिबाने सुद्धा बरोबर येऊ शकतात आणि त्यामुळे आणखी ४-५ प्रश्न बरोबर सुटू शकतात.

ताण-व्यवस्थापन, वेळ-व्यवस्थापन आणि प्राणायाम यांच्या मदतीने ४० ते ४५ गुण सहज मिळू शकतात. प्रश्नपत्रिका सोडवताना शक्यतो कोकणी - इंग्रजी - रिझनिंग - न्यूमेरिकल असा क्रम ठेवावा. प्रश्नांचा प्रकार सोडवताना सोपे प्रश्न लगेच ➔ मध्यम प्रश्न ➔ कठीण प्रश्न ➔ वेळखाऊ प्रश्न हा क्रम ठेवावा.


अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)