पर्यावरणपूरक गणेशोत्सव: निसर्ग, परंपरा आणि सृजनशीलतेचा अनोखा संगम

पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही आता केवळ संकल्पना राहिलेली नाही, तर ती अनेकांच्या जीवनशैलीचा भाग बनत आहे. निसर्गाशी सुसंवाद साधत, परंपरा जपत आणि सृजनशीलतेला वाव देत साजरा होणारा हा गणेशोत्सव भविष्यातील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.

Story: साद निसर्गाची |
03rd October, 10:43 pm
पर्यावरणपूरक गणेशोत्सव: निसर्ग, परंपरा आणि सृजनशीलतेचा अनोखा संगम

यंदा गणेशोत्सवाच्या काळात गोव्यात दर दुसऱ्या घरात पर्यावरणपूरक सजावट पाहायला मिळाली. पाहून आनंद झाला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा सण नसून निसर्गाशी असलेले आपले नाते दृढ करणारा उत्सव आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ अधिक व्यापक होताना दिसत आहे. यंदाही अनेकांनी प्लास्टिक, थर्माकोल आणि कृत्रिम सजावटींना फाटा देत नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करून आकर्षक सजावट साकारली. राज्यातील अंत्रूज महालात सर्वाधिक सुबक आणि सृजनशील सजावटी पाहायला मिळाल्या.

सावई-वेरे वेलकास येथील अभय वेलकासकर यांनी पत्रावळी, सुंभ, सुपारीची टरफले व लाकडाचा वापर करून घराचा मुख्य मंडप सजवला होता. बाप्पांच्या बसकेच्या जागी हुबेहूब अरण्य उभारण्यात आले होते. नैसर्गिकरीत्या गवत उगवून काढणे, कडधान्य रुजवणे, त्याव्यतिरिक्त वड-पिंपळासारख्या भल्यामोठ्या वृक्षांच्या पारंब्यांचा वापर करून अरण्याची प्रतिकृती उभारण्यात त्यांनी यश मिळवले. या सजावटीतून जंगलसंवर्धनाचा संदेशही दिला जात होता. रस्त्याकडून त्यांच्या घराकडे जाणारी वाट माडाच्या झावळ्यांपासून सजवण्यात आली होती. प्रवेशद्वाराच्या सजावटीसाठी वापरात आणलेल्या विणकाम केलेल्या माडाच्या झावळ्या तर फारच आकर्षक दिसत होत्या. स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून किती सुंदर सजावट करता येते, याचे हे 

उत्तम उदाहरण.

खेडे, सावई-वेरे येथील खेडेकर कुटुंबीयांनी पूर्णतः सुंभ वापरून सजावट केली होती. घरातील पारंपरिक जागा, जसे दीप ठेवण्याची विशिष्ट जागा, कंदील, सुंभाच्या साहाय्याने तयार करण्यात आल्या होत्या. शेणाने सारवलेल्या जमिनीवर साकारलेली रंगबेरंगी फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी संपूर्ण सजावटीला एक वेगळेच स्वरूप प्राप्त करून देत होती. ग्रामीण संस्कृतीतील अनेक घटक या सजावटीत जपले गेले होते. आधुनिकतेच्या काळातही परंपरेचा वारसा जपण्याचा त्यांचा प्रयत्न विशेष कौतुकास्पद होता.

पाली, सावई-वेरे येथील तृप्ती पालकर यांनी कलात्मक पद्धतीने माटोळी बांधली होतीच; पण त्यापलीकडे त्यांनी केलेली इतर सजावटदेखील त्यांच्या सृजनशील विचारांची साक्ष देत होती. विद्युत रोषणाईचा नियंत्रित पद्धतीने वापर करून सावलीच्या साहाय्याने पताकेवर कैलासपती श्री शंकराची प्रतिमा साकारण्यात आली होती. प्रकाश आणि सावल्यांच्या आधारे साधेपणातही प्रभावी कलाकृती कशी निर्माण करता येते, याचे हे सुंदर उदाहरण होते.

कावंगाळ, सावई-वेरे येथे गौतम नाईक यांच्या निवासस्थानी गोवऱ्या (गाईचे सुके शेण) वापरून ‘गजेंद्रमोक्ष’ देखावा साकारण्यात आला होता. गजराज, ब्रह्मदेव, गरुडदेव आणि मगरीच्या हुबेहूब प्रतिमा तयार करण्यासाठी कागद, पुठ्ठा इत्यादी म्हणजेच पर्यावरणपूरक सामग्रीचाच वापर करण्यात आला होता. सजावटीसाठी वापरात आणलेली सामग्री खासकरून गोवऱ्या कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या दोन महिने अगोदर गोळा करण्यास सुरुवात केली असल्याचे समजले. गणेश विसर्जनानंतर या सगळ्या गोवऱ्या खत म्हणून थेट माडांना घालणार असल्याचे गौतमने सांगितले. धार्मिक कथेला पर्यावरणपूरक माध्यमातून साकारण्याचा हा अभिनव प्रयत्न होता.

शिलवाडा, सावई-वेरे येथील शिलकर कुटुंबीयांनी नारळाच्या शेंडीची फुले (नारळाचा डोळा), कौलाचे तुकडे, लाकूड, बांबू, पुठ्ठा व सुतळी वापरून तऱ्हेतऱ्हेची फुले आणि इतर विविध आकार साकारत गणपती सजावटीला सुंदर स्वरूप दिले होते. शेणाने सारवलेली जमीन या सजावटीला एक वेगळे आणि आकर्षक स्वरूप प्राप्त करून देत होती. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्थानिक व नैसर्गिक साहित्याचा वापर दिसून येत होता.

येथील कित्येक घरांच्या भिंती रंगवण्यासाठी प्रसिद्ध कारवी चित्रकला वापरात आणली होती. या सर्व सजावटी पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही आता केवळ संकल्पना राहिलेली नाही, तर ती अनेकांच्या जीवनशैलीचा भाग बनत आहे. निसर्गाशी सुसंवाद साधत, परंपरा जपत आणि सृजनशीलतेला वाव देत साजरा होणारा हा गणेशोत्सव भविष्यातील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.


स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)