पर्वरी उड्डाणपुलाचा फज्जा! अटल सेतूही ‘पांढरा हत्ती’ ठरण्याच्या मार्गावर

आता सरकारने केवळ उड्डाणपुलाकडे पाहू नये. पर्वरीपासून पणजी-मेरशीपर्यंत संपूर्ण वाहतूक साखळीचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करून प्रवेश-निर्गमन जंक्शन, अटल सेतू जोडणी आणि वाहतूक प्रवाहाची पुनर्रचना करण्याची वेळ आली आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
26th September, 11:24 pm
पर्वरी उड्डाणपुलाचा फज्जा! अटल सेतूही ‘पांढरा हत्ती’ ठरण्याच्या मार्गावर

वा​हतूक कोंडीचा शाप दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला पर्वरी उन्नत महामार्ग उद्घाटनानंतर काही दिवसांतच ‘समस्या सोडवणारा प्रकल्प’ नव्हे, तर समस्या दुसरीकडे ढकलणारा प्रकल्प ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सहा पदरी, ५.१५ किलोमीटरच्या या ₹६४१ कोटींच्या प्रकल्पाने पर्वरीला दिलासा देण्याऐवजी त्याच्या प्रवेश-निर्गमन जंक्शनवरच वाहतुकीचा गोंधळ निर्माण केला असून, त्याचे पडसाद आता पणजी आणि मेरशीपर्यंत उमटत आहेत.

प्रकल्पाचा सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे फ्लायओव्हरवर वाहतूक वेगाने धावते; पण ती खाली उतरते किंवा वर चढते त्या ठिकाणीच वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारलेल्या मार्गाच्या प्रवेश आणि निर्गमनाची रचना जर हजारो वाहनांचा प्रवाह सुरळीतपणे हाताळू शकत नसेल, तर मग या प्रकल्पाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.

पर्वरीचा प्रश्न केवळ एका उड्डाणपुलापुरता मर्यादित राहिलेला नाही. अटल सेतू आणि पर्वरी उड्डाणपूल यांची जोडणीच आता वाहतुकीसाठी नवा पेच बनताना दिसत आहे. पर्वरीच्या दिशेने अटल सेतूचे काही प्रवेश आणि निर्गमन मार्ग बंद अथवा मर्यादित झाल्याने वाहतुकीचा भार उपलब्ध असलेल्या इतर मार्गांवर ढकलला जात आहे. त्याचा परिणाम पर्वरीच्या पुढे पणजी शहर आणि मेरशी वर्तुळापर्यंत (सर्कल) जाणवत आहे. म्हणजेच, ज्या प्रकल्पासाठी वाहतूक कोंडी कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले, त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतुकीला सामावून घेण्यासाठी पुन्हा जुन्याच रस्त्यांवर ताण वाढत आहे.

उड्डाणपुलावरील रस्ता कितीही रुंद असला तरी त्याचा उपयोग तेव्हाच होतो, जेव्हा त्याच्या दोन्ही टोकांवरील वाहतूक सुरळीतपणे वितरित होते. अन्यथा सहा पदरी रस्ता हा एका टोकाला वेगाने वाहतूक आणून दुसऱ्या टोकाला ती एका अरुंद वाहतूक जाळ्यात ढकलणारा ‘फनेल’ ठरतो. पर्वरीमध्ये सध्या नेमकी हीच परिस्थिती निर्माण होत आहे का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर वाहतूक नियमांमध्ये बदल, दुचाकींवरील निर्बंध आणि प्रवेश-निर्गमन व्यवस्थेतील बदल यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ज्या गोष्टींचे नियोजन प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हायला हवे होते, त्यावर प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर उपाय शोधावे लागत असतील, तर हा नियोजन प्रक्रियेचा गंभीर धडा आहे.

अटल सेतूवरही कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्याचा उद्देश पर्वरी-पणजी वाहतूक सुलभ करणे हा होता. आता नव्या फ्लायओव्हरच्या जोडण्या आणि जंक्शनमुळे त्याच्या काही प्रवेश-निर्गमन मार्गांवर परिणाम होत असेल, तर दोन मोठ्या प्रकल्पांचे एकात्मिक नियोजन नेमके कुठे चुकले? गोव्याच्या पायाभूत सुविधांमध्ये हीच जुनी समस्या पुन्हा समोर येत आहे. प्रकल्प स्वतंत्रपणे भव्य; पण संपूर्ण वाहतूक व्यवस्था म्हणून अपुरी.

एक पूल बांधला, दुसरा पूल बांधला आणि दोन्ही जोडले की वाहतूक समस्या सुटते, असा साधा हिशेब शहराच्या वाहतुकीला लागू होत नाही. वाहनांची संख्या, जंक्शनची क्षमता, वळणांची रचना, मर्जिंग पॉईंट्स (Merging points), आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आणि पर्यायी मार्ग यांचा एकत्रित विचार आवश्यक असतो.

पर्वरीकरांना आणि गोव्यातील वाहनचालकांना आता घोषणांची नव्हे, तर प्रत्यक्ष वाहतूक दिलाशाची गरज आहे. ₹६४१ कोटींच्या प्रकल्पाचा उद्देश जर पर्वरीची कोंडी कमी करणे असेल, तर त्याचा परिणाम पणजी आणि मेरशीमध्ये अतिरिक्त कोंडीच्या स्वरूपात दिसणे ही गंभीर बाब आहे.

उड्डाणपुलाला ‘यशस्वी’ म्हणण्यासाठी त्याची उंची, लांबी किंवा उद्घाटनाचा सोहळा पुरेसा नाही. तो ज्या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा भाग आहे, ती व्यवस्था किती कार्यक्षम झाली, हा खरा प्रश्न आहे. अन्यथा पर्वरीचा उड्डाणपूल आणि अटल सेतू हे दोन्ही प्रकल्प गोव्याच्या वाहतूक व्यवस्थेतील महागडे ‘शॉर्टकट’ ठरतील, ज्यांनी कोंडी संपवण्याऐवजी तिचे ठिकाण बदलले.

आता सरकारने केवळ उड्डाणपुलाकडे पाहू नये. पर्वरीपासून पणजी-मेरशीपर्यंत संपूर्ण वाहतूक साखळीचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करून प्रवेश-निर्गमन जंक्शन, अटल सेतू जोडणी आणि वाहतूक प्रवाहाची पुनर्रचना करण्याची वेळ आली आहे. कारण ₹६४१ कोटींचा पूल बांधणे सोपे आहे; पण त्याला वाहतूक देणारे योग्य जंक्शन बांधणे हीच खरी अभियांत्रिकी परीक्षा आहे.