बेकायदा डोंगर कापणीसाठी सरकारी नावाचा दुुरुपयोग


13th January 2018, 02:23 am
प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : चिंबल ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक - २८/० येथे बेकायदा पद्धतीने डोंगर कापणी सुरू असल्याच्या तक्रारीची उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी गंभीर दखल घेतली आहे. या ठिकाणी ताबडतोब काम बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत. विशेष म्हणजे चिंबल ग्राम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या बेकायदा डोंगर कापणीची माहिती भरारी पथकाला दिली होती. ‘सरकारी ड्युटी' असे लेबल चिकटवलेले ट्रक या बेकायदा कामांत वापरण्यात आल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
चिंबल ग्रामसंस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार भरारी पथकाच्या नजरेला आणून दिला होता. भरारी पथकाने घटनास्थळी भेट दिली असता तिथे मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी झाल्याचे निदर्शनास आले. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर त्यांनी ताबडतोब काम बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. या प्रकरणी वास्को येथील मेसर्स महाधन रियल इस्टेट एलएलपी या कंपनीला नोटीस जारी करण्यात आली आहे. वास्को पोलिसांमार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
सरकारी लेबल कसे काय ?
या ठिकाणी जेसीबी आणि ट्रक मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. चिंबल ग्रामसंस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे परवान्यांची चौकशी केली. यावेळी सर्व परवाने असल्याचे कारण सांगण्यात आले. या प्रकाराचे छायाचित्रीकरण केले असता तिथे गुंतलेल्या ट्रकांवर ‘सरकारी ड्युटी' अशी लेबल लावण्यात आल्याचे पाहणीत आले. ही खबर ताबडतोब भरारी पथकाला देण्यात आली. भरारी पथक येण्यापूर्वीच येथील कामगारांनी मशीन हटवली व ते तिथून पसार झाले. या कंत्राटदाराकडे खरोखरच परवाने असते तर त्यांनी पळ काढला नसता. परंतु खासगी आणि बेकायदा कामांसाठी सरकारी नावाचा दुरूपयोग करण्याचा प्रकार गंभीर आहे आणि त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी तुकाराम कुंकळ्येकर यांनी केली आहे.