पर्थ कसोटी : ट्रॅव्हिस हेडचे तुफानी शतक

पर्थ : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी अत्यंत थरारक आणि ऐतिहासिक ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, हा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. ॲशेसच्या इतिहासात १९२१ नंतर, म्हणजेच तब्बल १०४ वर्षांनंतर असे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा कसोटी सामन्याचा निकाल केवळ दोन दिवसांत लागला आहे.
विजयासाठी मिळालेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने आक्रमक शतकी खेळी केली. त्याने ८३ चेंडूत १६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १२३ धावा कुटल्या. त्याला मार्नस लाबुशेन (५१ धावा) आणि जेक वेदराल्ड (२३ धावा) यांची चांगली साथ मिळाली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य सहज पार केले. दुसऱ्या डावात इंग्लंडची गोलंदाजी निष्प्रभ ठरली.
तत्पूर्वी, सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात १७२ धावा केल्या होत्या, ज्यात हॅरी ब्रूकने ५२ धावांचे योगदान दिले. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने घातक मारा करत पहिल्या डावात ७ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ५ आणि ब्रायडन कार्सने ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १३२ धावांत रोखले. यामुळे इंग्लंडला ४० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली होती.
मात्र, दुसऱ्या डावात इंग्लंडचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले आणि संपूर्ण संघ १६४ धावांत गारद झाला. मिचेल स्टार्कने सामन्यात एकूण १० विकेट्स घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. हेडच्या दमदार शतकामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
हेडचे विक्रम
पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना फक्त २१ धावा केल्या. पण त्याला शेवटच्या डावात सलामीची संधी देण्यात आली आणि ट्रॅव्हिस हेडने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. ट्रॅव्हिस हेडने सुरुवातीपासूनच जलद धावा केल्या आणि पर्थमधील कठीण वाटणारे लक्ष्य सोपे केले. त्याने केवळ ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे अॅशेसच्या इतिहासातील संयुक्त तिसरे सर्वात जलद अर्धशतक आहे.
ट्रॅव्हिस हेडने अवघ्या ८३ चेंडूत १६ चौकार व ४ षटकारांसह १२३ धावा ठोकत तुफानी खेळी खेळली. केवळ ६९ चेंडूत त्याने शतक झळकावले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील चौथ्या डावातील हे सर्वात जलद शतक ठरले, यासह हा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला आहे. याचबरोबर त्याने इंग्लंडच्या गिल्बर्ट जेसपचा विक्रम मोडला. जेसपने १९०२ च्या अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या डावात ७६ चेंडूत शतक झळकावले होते.
ट्रॅव्हिस हेडने १४८.१९ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघाच्या कोणत्याही फलंदाजाचा हा सर्वात उत्तम स्ट्राइक रेट आहे. यासह त्याने जॉनी बेअरस्टोचा विक्रम मोडला, ज्याने २००२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १४७.८२ च्या स्ट्राइक रेटने शतक झळकावले होते. याशिवाय ट्रॅव्हिस हेड हा अॅशेसमध्ये ८५पेक्षा कमी चेंडूत दोन शतके करणारा एकमेव फलंदाज आहे.
पहिल्या डावात ७ व दुसऱ्या डावात ३ बळी घेत स्टार्कने ऑस्ट्रेलियाचा विजयाचा भक्कम पाया रचला. यासह स्टार्कने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. मिचेल स्टार्क हा अॅशेस कसोटीत १० बळी घेणारा दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला, त्याच्या १९९०-९१ मध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने अशी कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात ७ बळी घेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २०० बळी पूर्ण केले आणि भारतीय दिग्गज रविचंद्रन अश्विनला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत २०० बळी घेणारा तो पॅट कमिन्स आणि नाथन लायन यांच्यानंतर जगातील तिसरा गोलंदाज आहे.
अॅशेसमध्ये १० बळी घेणारे गोलंदाज
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया): १० बळी : पर्थ, २०२५
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड): ११ बळी : चेस्टर-ले-स्ट्रीट, २०१३
जेम्स अँडरसन (इंग्लंड): १० बळी : नॉटिंगहॅम, २०१३
क्रेग मॅकडर्मॉट (ऑस्ट्रेलिया) – ११ बळी : पर्थ, १९९१
डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया) – २१९ विकेट्स*
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – २१५ विकेट्स
मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – २०१ विकेट्स*
रविचंद्रन अश्विन (भारत) – १९५ विकेट्स
जसप्रीत बुमराह (भारत) – १८४ विकेट्स*
कसोटीत सर्वाधिक स्ट्राइक रेटने शतक झळकवणारे फलंदाज
१४८.१९ – ट्रॅव्हिस हेड विरुद्ध इंग्लंड, २०२५
१४७.८२ – जॉनी बेअर्स्टो विरुद्ध न्यूझीलंड, २०२२
१३२.१४ – नॅथन ॲस्टल विरुद्ध इंग्लंड, २००२
१२८.४२ – शाहिद आफ्रिदी विरुद्ध वेस्ट इंडिज, २००५
ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाले दोन जागतिक विक्रम
सर्वात जलद पाठलाग : कसोटीमध्ये २०० हून अधिक धावांचे लक्ष्य सर्वात कमी षटकांत (२८.२ षटके) पूर्ण करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला संघ ठरला. यापूर्वीचा विक्रम १९९४ मध्ये इंग्लंडच्या नावावर होता (२०४ धावांचा पाठलाग ३५.३ षटकांत).
सर्वाधिक रनरेट : ऑस्ट्रेलियाने २८.२ षटकांत ७.२३ च्या सर्वोच्च रनरेटने हे लक्ष्य पूर्ण केले. २०० हून अधिक धावांचा पाठलाग करताना हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च रनरेट ठरला आहे.
मिचेल स्टार्क ‘प्लेअर ऑफ द मॅच’
ऑस्ट्रेलियाच्या या ऐतिहासिक विजयात मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीचाही मोठा वाटा राहिला. त्याने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ३ अशा एकूण १० विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
ट्रेव्हिस हेडचे ५ मोठे विक्रम
१२३ वर्षांचा जुना विक्रम मोडला: कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात (धावांचा पाठलाग करताना) सर्वात जलद शतक (६९ चेंडू) ठोकण्याचा पराक्रम हेडने केला. यासह त्याने इंग्लंडच्या गिल्बर्ट जेसॉपचा (१९०२ मध्ये ७६ चेंडू) १२३ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.
ॲशेसमध्ये दुसरे जलद शतक: ॲशेसच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात जलद शतक ठरले आहे. या यादीत ॲडम गिलख्रिस्ट (५७ चेंडू, २००६) अव्वल स्थानी आहे.
सर्वाधिक स्ट्राईक रेट: कसोटीच्या यशस्वी रन चेसमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट (१४८.१९) नोंदवणारा तो फलंदाज ठरला. त्याने जॉनी बेअरस्टोचा (१४७.८२) विक्रम मोडला.
संयुक्त जलद ओपनर शतक: कसोटीत संयुक्तपणे सर्वात जलद शतक ठोकणारा तो सलामीवीर बनला (६९ चेंडू). त्याने डेव्हिड वॉर्नरच्या (२०१२) विक्रमाशी बरोबरी साधली.
कसोटीतील ५ वे जलद शतक: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत (६९ चेंडू) हेड संयुक्तपणे पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.